US Federal Reserve New Chairman Kevin Warsh: अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या 'फेडरल रिझर्व्ह'मध्ये मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे. बुधवारी, १३ मे रोजी अमेरिकन सिनेटमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण मतदानानंतर केविन वॉर्श यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थेच्या मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व आता वॉर्श यांच्याकडे असेल. व्याजदर आणि वाढती महागाई यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं असताना ही नियुक्ती झालीये.
जेरोम पॉवेल यांची घेणार जागा
५६ वर्षीय केविन वॉर्श यांची ५४-४५ अशा मतांच्या फरकानं या पदावर निवड झाली आहे. वॉर्श यांनी यापूर्वी फेड गव्हर्नर म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला; केवळ जॉन फेटरमन या एकाच डेमोक्रॅट खासदारानं त्यांच्या बाजूने मतदान केलं. वॉर्श आता जेरोम पॉवेल यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ या शुक्रवारी संपत आहे. पॉवेल हे बोर्डाचे गव्हर्नर म्हणून कायम राहतील, मात्र अध्यक्षपदाची धुरा आता वॉर्श सांभाळतील. वॉर्श यांची ४ वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून आणि १४ वर्षांसाठी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
वॉर्श यांच्यासमोरील प्रमुख आव्हानं
केविन वॉर्श यांच्यासमोर सध्या अनेक कठीण आव्हाने उभी आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत आहेत. तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर ६ टक्क्यांवर पोहोचला आहे, जी डिसेंबर २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ आहे. इराण संघर्षामुळे वाढलेले तेलाचे दर आणि नवीन टॅरिफ धोरणं यामुळे महागाई वाढली आहे.
व्याजदरात कपात होणार का?
मार्केट तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदर ३.५% ते ३.७५% च्या दरम्यान स्थिर ठेवू शकते. जर महागाईचा वेग असाच कायम राहिला, तर जानेवारी २०२७ पर्यंत व्याजदरात वाढही केली जाऊ शकते. १६-१७ जून रोजी होणारी बैठक ही वॉर्श यांच्या कार्यकाळातील पहिली मोठी परीक्षा ठरेल. राष्ट्राध्यक्षांच्या मागणीनुसार व्याजदर कमी करायचे की महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पावलं उचलायची, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
