Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:43 IST2026-05-14T10:32:46+5:302026-05-14T10:43:20+5:30
Gold Silver Rate Today: बुधवारी सरकारनं सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यामुळे किमतीत मोठी वाढ झाली होती. परंतु आज त्यात मोठी घसरण दिसून आली.

Gold Silver Rate Today: १४ मे २०२६, गुरुवार रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी सरकारनं सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यामुळे किमतीत मोठी वाढ झाली होती.

त्यावेळी चांदीनं ३,००,००० रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता, मात्र आज पुन्हा किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. जागतिक कमोडिटी बाजारातही आज अशीच स्थिती दिसून आली.

गुरुवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,६१,८१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. बुधवारी सोनं १,६२,२५० रुपयांवर बंद झालं होतं. तर चांदीचा दर आज २,९७,००० रुपये प्रति किलोवर आला आहे, जो काल ३,००,५०० रुपयांवर बंद झाला होता. चांदीच्या किमतीत एका दिवसात ३,५०० रुपयांची घट झाली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचं झालेलं अवमूल्यन आणि डॉलरची मजबुती यांचा हा परिणाम असल्याचं मानलं जात आहे. 'आयबीजेए'च्या आकडेवारीनुसार, बुधवारी २४ कॅरेट सोने १,६०,९८० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,५७,११० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच जनतेला एक वर्ष सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं, त्यानंतर आता आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानं सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलंय. ज्यांच्या घरी लग्नसराई आहे, त्यांना आता महागड्या दरानं सोनं-चांदी आणि इतर वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताची आयात आणि निर्यात प्रभावित झाली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत असल्यानं भारतासह अनेक देशांवर महागाईचं संकट ओढवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संकटामुळे परकीय चलन वाचवण्यासाठी इंधनाचा वापर जपून करणं, सोनं खरेदी आणि परदेश दौरा पुढे ढकलणे यांसारख्या उपायांचं आवाहन केलं होतं, त्यानंतर सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली होती. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, वाढीव शुल्काचा खरा परिणाम येणाऱ्या दिवसांत दिसून येऊ शकतो.

इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, बुधवारी बाजार बंद होताना २४ कॅरेट सोन्याची किंमत १,६०,९८० रुपये (जीएसटी आणि मेकिंग चार्जशिवाय) होती, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,५७,११० रुपये प्रति १० ग्रॅम होता. याच काळात एमसीएक्सवर चांदी ८.५३ टक्क्यांच्या वाढीसह ३,०२,८७८ रुपयांवर पोहोचली होती.

आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,६२,२६० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४८,९५० रुपये झाला आहे. मुंबईत हाच दर २४ कॅरेट सोन्यासाठी १,६२,३३० रुपये आणि २२ कॅरेटसाठी १,४८,८०० रुपये झालाय. हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,६२,३३० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४८,८०० रुपये झालाय.

















