नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:31 IST2026-05-14T11:30:09+5:302026-05-14T11:31:55+5:30
सीबीआयने लोखंडेच्या संपर्कात असलेल्या बिबवेवाडीतील मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली.

नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर
अहिल्यानगर/पुणे : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले असून, या घोटाळ्यातील ‘पुणे कनेक्शन’ समोर आले आहे. सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून मुख्य संशयित धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर, लोखंडेच्या संपर्कात असलेल्या बिबवेवाडीतील मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. विद्यार्थी शोधणे, त्यांच्याकडून पैसे गोळा करणे आणि संशयितांपर्यंत पोहोचवणे, अशी भूमिका या दोघांची असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
सुखसागरनगर परिसरातून मनीषा वाघमारे (वय ४६) हिला ताब्यात घेतले असून, मांजरीतून वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या शेषराव सोलंकी याला गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारपासून पुणे पोलिस चार जणांचा शोध घेत होते. त्यामध्ये धनंजय लोखंडे आणि ओंकार शिंगोटे यांचाही समावेश होता.
धनंजय लोखंडे याचे लोकेशन वाघोली परिसरात मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो फरार झाला. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी परिसरातून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) धनंजय आणि ओंकार या दोघांना ताब्यात घेतले.
तांत्रिक तपासाच्या दरम्यान मनीषा वाघमारे आणि शेषराव सोलंकी हे दोघेही धनंजय लोखंडेच्या सतत संपर्कात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सकाळी सुमारे आठच्या सुमारास सुखसागर नगर येथून मनीषा वाघमारे हिला ताब्यात घेण्यात आले.