कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:10 IST2026-05-14T14:05:38+5:302026-05-14T14:10:04+5:30

सहसा कर्ज लवकरात लवकर फेडणे हा एक चांगला आर्थिक निर्णय मानला जातो. यामुळे व्याजाचा बोजा कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. मात्र, वैयक्तिक वित्त नियोजनाच्या दृष्टीने पाहिल्यास, कर्ज मुदतीपूर्वी बंद करणे नेहमीच फायदेशीर ठरतेच असे नाही. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तुम्ही मोठे कर्ज वेळेपूर्वी फेडण्याचा विचार करत असाल, तर व्याजाची बचत पाहू नका. जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात दुसरे मोठे कर्ज घ्यायचे असेल, तर सध्याचे कर्ज सुरू ठेवणे ‘क्रेडिट हेल्थ’साठी फायदेशीर ठरू शकते.

क्रेडिट मिक्समध्ये बदल : बँका सुरक्षित आणि असुरक्षित अशा दोन्ही प्रकारच्या कर्जांचे मिश्रण असल्यास चांगला स्कोअर देतात. एखादे कर्ज बंद झाल्यामुळे हे संतुलन बिघडू शकते.

कर्जाचा कालावधी : तुम्ही जुने कर्ज बंद केल्यास तुमच्या क्रेडिट इतिहासाचा सरासरी कालावधी कमी होतो. क्रेडिट स्कोअर ठरवताना कर्ज किती जुने आहे, याला मोठे महत्त्व असते.

क्रेडिट युटिलायझेशन : अनेकदा कर्ज बंद केल्याने तुमची एकूण उपलब्ध पत मर्यादा कमी होते, ज्यामुळे स्कोअरमध्ये किंचित घट होऊ शकते.

















