सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:15 IST2026-05-14T10:17:56+5:302026-05-14T11:15:40+5:30

महागाईचा 'मे' धमाका! गेल्या ४ दिवसांत बदलल्या १० मोठ्या गोष्टी..!

नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांत (१० मे ते १३ मे २०२६) देशाच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे फेरबदल झाले आहेत. पश्चिम आशियातील तणाव आणि इराण संकटामुळे केंद्र सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले असून, याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. सोन्यावरील आयात शुल्कापासून ते थेट मनरेगा कायद्यापर्यंत झालेल्या या १० मोठ्या बदलांचा घेतलेला हा आढावा...

१. पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन- रविवारी हैदराबादमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 'आर्थिक शिस्त' पाळण्याचे आवाहन केले. परकीय चलन साठा वाचवण्यासाठी त्यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे, परदेशवारी पुढे ढकलून देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचे आणि कंपन्यांना पुन्हा 'वर्क फ्रॉम होम' मॉडेल अवलंबण्याचे आवाहन केले. तसेच, खतांचा वापर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

२. सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ- पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क ६% वरून थेट १५% पर्यंत वाढवले आहे. यामध्ये १०% मूळ सीमा शुल्क आणि ५% कृषी पायाभूत सुविधा उपकर यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किमती कडाडल्या आहेत.

३. दुधाच्या किमतीत लिटरमागे २ रुपयांची वाढ- 'अमूल' आणि 'मदर डेअरी'सारख्या दिग्गज कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरीचे फुल क्रीम दूध आता ७२ रुपये लिटर झाले आहे. अमूल गोल्डच्या अर्ध्या लिटरच्या पिशवीसाठी आता ३५ रुपये मोजावे लागणार आहेत.

४. पेट्रोल-डीजल दरवाढीचे संकेत- RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे की, जर पश्चिम आशियातील युद्ध दीर्घकाळ चालले, तर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींचा भार सरकारला पेलणे कठीण होईल. परिणामी, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

५. रुपयाची ऐतिहासिक घसरण- डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळी गाठली आहे. गेल्या चार दिवसांत रुपया घसरून ९५.७० प्रति डॉलर या ऐतिहासिक नीचांकावर आला आहे, ज्यामुळे आयात होणाऱ्या वस्तू अधिक महाग होतील.

६. महागाईचा दर ३.४८ टक्क्यांवर- १२ मे रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ महागाई दर वाढून ३.४८% झाला आहे. विशेष म्हणजे खाद्यान्न महागाई ४.२० टक्क्यांवर पोहोचली असून शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाईचा चटका अधिक जाणवत आहे.

७. 'मनरेगा' होणार बंद; येणार नवा कायदा- केंद्र सरकारने २० वर्षे जुना मनरेगा (MGNREGA) कायदा संपवण्याची घोषणा केली आहे. १ जुलै २०२६ पासून मनरेगाची जागा 'विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)' म्हणजेच VB-G RAM G हा कायदा घेणार आहे. यात गॅरंटेड रोजगाराचे दिवस १०० वरून १२५ दिवस करण्यात आले आहेत.

८. GDP जाहीर करण्याची तारीख बदलली- ख्यिकी मंत्रालयाने जीडीपी आकडेवारी जाहीर करण्याची जुनी परंपरा बदलली आहे. आता दरवर्षी मे महिन्याऐवजी ७ जूनला जीडीपीचे आकडे प्रसिद्ध होतील. यावर्षी ७ जूनला सुट्टी असल्याने, २०२५-२६ चे वार्षिक आकडे ५ जून २०२६ रोजी जाहीर केले जातील.

९. नवीन लेबर कोड- नवीन लेबर कोडच्या अंतिम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने विहित तासांपेक्षा जास्त काम केले, तर कंपनीला त्याला दुप्पट ओव्हरटाइम देणे अनिवार्य असेल. तसेच, महिलांना खाणकाम आणि अवजड यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात सर्व शिफ्टमध्ये काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

१०. एअर इंडियाची २९ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द- इराण युद्ध आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे एअर इंडियाने १३ मे रोजी मोठा निर्णय घेत २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. जून ते ऑगस्ट २०२६ दरम्यान प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे.