पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:22 IST2026-05-14T09:29:45+5:302026-05-14T10:22:37+5:30
Neet Paper Leak Updates: राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने केलेल्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणाचे मूळ केरळमध्ये शिकणाऱ्या आणि मूळचा राजस्थानमधील सिकर येथील रहिवासी असलेल्या एका एमबीबीएस विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले आहे.

पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षा रद्द होण्यामागचे धक्कादायक धागेदोरे आता समोर आले आहेत. राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने केलेल्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणाचे मूळ केरळमध्ये शिकणाऱ्या आणि मूळचा राजस्थानमधील सिकर येथील रहिवासी असलेल्या एका एमबीबीएस विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले आहे. या विद्यार्थ्याने परीक्षेपूर्वी एक ‘गेस पेपर’ आपल्या मित्रांना आणि सिकरमधील एका हॉस्टेल मालकाला पाठवला होता. हाच पेपर पुढे संपूर्ण राजस्थानमध्ये वेगाने व्हायरल झाला.
असा झाला पेपरचा प्रवास
‘स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप’चे आयजी अजय पाल लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याला एका मित्राकडून ही फाईल मिळाली होती. त्याने ती सिकरमधील एका हॉस्टेल मालकाला आणि इतर मित्रांना पाठवली. हॉस्टेल मालकाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत व्हावी म्हणून ती फाईल दिली. मात्र, नंतर संशय आल्याने याच हॉस्टेल मालकाने पोलिसांना आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) याची माहिती दिली. हा पेपर राजस्थानमध्ये पोहोचण्यापूर्वी हरियाणामधील गुरुग्राम आणि महाराष्ट्रातील नाशिक लिंकद्वारे रूट झाल्याचा संशय आहे.
‘प्रायव्हेट माफिया’ सोशल ग्रुप
सोशल मीडियावर ‘प्रायव्हेट माफिया’ नावाचा एक ग्रुप सक्रिय होता. या ग्रुपवर पीडीएफ फाईल शेअर करण्यात आली होती. या फाईलमधील केमिस्ट्रीचे ४५ प्रश्न आणि बायोलॉजीचे ९० प्रश्न मूळ नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळले आहेत.
१५० हून अधिक जणांची चौकशी
एसओजीने सिकर, अलवर, जयपूर आणि झुंझुनू परिसरातून १५० हून अधिक संशयित विद्यार्थी, पालक आणि मध्यस्थांची चौकशी केली. एका फोटोकॉपी दुकानदारालाही ताब्यात घेण्यात आले, ज्याने या पेपरच्या झेरॉक्स प्रति विद्यार्थ्यांना काढून दिल्या होत्या.
देशभरात कुठे आंदोलन?
नवी दिल्ली : युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे आंदोलन
जयपूर : राजस्थानमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.
हरिमपूर : एनएसयूआयने पत्रकार परिषद घेऊन आंदोलन केले व एनटीए बरखास्त करण्याची मागणी केली.
शिमला : हिमाचल प्रदेश विद्यापीठाजवळ निदर्शने करत एनटीएचा पुतळा जाळला.
१० वर्षांत देशात तब्बल ८९ वेळा विविध परीक्षांचे पेपर फुटले आहेत. याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. ४८ वेळा फेरपरीक्षा घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
मंत्र्याने मागितली माफी
राजस्थानचे मंत्री झाबर सिंह खर्रा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची जाहीर माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : काँग्रेसची मागणी
काँग्रेस ने पत्रकार परिषद घेऊन या महाघोटाळ्यावरून थेट केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा आणि या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाची ‘संयुक्त संसदीय समिती’ मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.