दोनदा लँडिंगचा प्रयत्न अन् त्यानंतर अजितदादांचं विमान खाली कोसळलं; अखेरच्या क्षणाचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:05 IST2026-01-28T15:56:54+5:302026-01-28T16:05:29+5:30

बुधवारी २८ जानेवारीला पुणे जिल्ह्यातील बारामती येथे भीषण विमान अपघात झाला. या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका खासगी विमानाने ते बारामतीला सभेसाठी चालले होते. या दुर्घटनेत अजित पवारांसह अन्य ४ जणांचाही मृत्यू झाला आहे.

अजित पवारांना घेऊन जाणारे हे विमान Learjet 45 होते. ज्याचे रजिस्ट्रेशन नंबर VT SSK असं आहे. हे विमान दिल्लीतील VSR कंपनीकडून चालवण्यात येते. आज सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने हे विमान जात होते. मात्र बारामती येथे विमान लँडिंग होण्याआधीच ही मोठी दुर्घटना घडली.

ओपन सोर्स इंटेलिजेंस(OSINT) टीमने विमानाशी निगडीत फ्लाईट ट्रॅकिंग डेटा काढला आहे. त्याशिवाय दोन वेगवेगळ्या कमर्शियल फ्लाईट डेटा प्लॅटफॉर्मने याबाबत पुष्टी केली आहे. इंडिया टुडेने OSINT च्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली.

फ्लाईट डेटानुसार, ज्या विमानाचा अपघात झाला ते कोसळण्यापूर्वी बारामती एअरपोर्टवर दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत होते. या विमानाने मुंबईहून उड्डाण भरल्यानंतर काही वेळाने सकाळी ७.५६ मिनिटांनी रडारवर दिसणे सुरू झाले होते. हे विमान जवळपास ८.१० मिनिटांवर पूर्णपणे हवेत होते.

बारामतीला पोहचण्याची वेळ जवळ आली होती. विमान लँडिंग होणार होते. त्यावेळी सकाळी ८.३७ मिनिटे झाले होते. परंतु बारामती एअरपोर्टपासून २० किमी अंतराच्या आधीच हे विमान रडारवर गायब झाले. त्यानंतर २ मिनिटांनी पुन्हा ८ वाजून ३९ मिनिटांनी हे विमान रडारवर दिसले असं Flightradar24 नावाच्या ओपन सोर्स फ्लाईट ट्रॅकिंगने डेटा दिला.

फ्लाईट ट्रॅकिंगमध्ये हे विमान हवेतच घिरक्या घेताना दिसत होते. त्यामुळे पायलटने विमान लँडिंग रद्द करून पुन्हा विमान उंचीवर नेण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत आहेत. ज्याला गो अराऊंड मॅन्युअर असे म्हटले जाते. त्यानंतर हे विमान सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी पुन्हा रडारवरून गायब झाले.

या विमानाची उंची आणि उड्डाणाचा मार्ग दोघांचेही विश्लेषण केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, पहिल्यांदा रडारवर गायब होण्यापूर्वी हे विमान सातत्याने खाली येत होते. म्हणून लँडिंगसाठी रनवेच्या दिशेने जात होते. जेव्हा विमान ८.३९ मिनिटांनी पुन्हा रडारवर दिसले तेव्हा विमानाने घेतलेली उंची वाढलेली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला गेला.

हवेत घिरक्या घेतल्यानंतर विमान पुन्हा खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्यांदा टचडाऊनचा प्रयत्न होता परंतु काही क्षणानंतर विमान रडारवरून पुन्हा गायब झाले. सोशल मीडियावर क्रॅश व्हिडिओचे जियोलोकेशनही आहे. त्यातून विमान बारामती एअरपोर्टपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर दुर्घटनाग्रस्त झाले याची पुष्टी होते.

व्हिडिओत दिसणारी घरे, जमिनीचा उंच भाग आणि झाडांचे पॅटर्न सॅटलाईट फोटोंशी तंतोतंत जुळतात. ही विमान दुर्घटना ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती रनवेजवळ घडली. व्हायरल व्हिडिओत विमानाचा मलबा विखुरलेला होता आणि आगीचा धुरळा सर्वत्र पसरल्याचे दिसून येते.

अपघातग्रस्त विमान हे लिअरजेट ४५ एक्सआर मॉडेल होते. हे बॉम्बार्डियर एरोस्पेसने बनवलेले मध्यम आकाराचे, ट्विन-इंजिन असलेले बिझनेस जेट आहे जे अंदाजे २००० ते २,२३५ नॉटिकल मैलांच्या रेंजसह आहे. हे विमान दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्स लिमिटेडच्या मालकीचे होते आणि खासकरून व्यावसायिक दौऱ्यासाठी वापरले जाते.