अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 11:33 IST2026-05-20T11:33:30+5:302026-05-20T11:33:56+5:30
Adhik Maas 2026 Gurupushyamrut Yoga: अधिक मासातील पहिल्या गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग जुळून आलेला आहे. शुभ मुहूर्त आणि सविस्तर माहिती जाणून घ्या...

अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
Adhik Maas 2026 Gurupushyamrut Yoga: मराठी वर्षांत सुमारे दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास सुरू आहे. यंदा २०२६ चा अधिक मास अतिशय शुभ आणि अधिक पवित्र मानला गेला आहे. ज्येष्ठ अधिक महिना सुरू होताच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला. यानंतर आता अधिक मासाच्या पहिल्या गुरुवारी गुरुपुष्यामृताचा अत्यंत चांगला योग जुळून आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? या काळ शुभ का मानला जातो? गुरुपुष्यामृत काळात नेमके काय करणे पुण्यकारक ठरते? सविस्तर जाणून घेऊया...
१७ मे २०२६ रोजी पवित्र अधिक ज्येष्ठ मासाला सुरुवात झाली असून १५ जून २०२६ रोजी या महिन्याची सांगता होणार आहे. अधिक मासाला 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधले जाते. या विशेष ३० दिवसांच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीने आणि मनोभावे भगवान विष्णू, कुलदेवता, इष्टदेवता, आराध्य देवता, सद्गुरू यांची उपासना केल्यास भक्तांना जीवनात अफाट लाभ आणि आध्यात्मिक उन्नती मिळते, असे मानले जाते. गुरुवार, २१ मे २०२६ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे.
अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत श्रेष्ठ योग
गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ०५ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ ०२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत म्हणजेच संपूर्ण दिवस गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे.
पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ
गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.
गुरुपुष्यामृत योग दिनी नवीन कार्याचा आरंभ
आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे, असे सांगितले जाते.
अधिक मास गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी पूजन
गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.
अधिक मास पहिल्या गुरुवारी सद्गुरू सेवा
अधिक मासात केलेली उपासना अनेकपटींनी पुण्यकारक ठरते, असे म्हटले जाते. अधिक मासात पहिल्याच गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येणे ही गुरूसेवेची सुवर्ण संधी मानली गेली आहे. या दिवशी दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराज, साई बाबा, सद्गुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण, उपासना करणे पुण्यकारक मानली गेली आहे. यामुळे चौफेर चोपट लाभ प्राप्त होऊ शकतील, गुरूंची कालातीत कृपा लाभू शकते. जी शक्य असेल ती सेवा आठवणीने करा. एक छोटी सेवाही गुरूपर्यंत पोहोचून त्याचे अनेक पटींनी मोठे फल प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
अधिक मास गुरुपुष्यामृत योगात नेमके काय करावे?
- गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करा. त्यानंतर देवघरात ठेवा.
- गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या वेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्याप्रकारे गुंतवणूक करु शकता.
- गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते. किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो.
- गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार यासंबंधीत महत्त्वाची कामे करता येऊ शकतात. अडकले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करता येऊ शकते.
- पैशांशी संबंधित काही समस्या असतील, तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी.
- गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
- तसेच ५२ श्लोकी गुरूचरित्र, दत्त बावनी अशी दत्तगुरूंची स्तोत्रे म्हणावीत किंवा श्रवण करावीत.
- स्वामींचा तारक मंत्र अवश्य म्हणावा, शक्य असेल तर ११ वेळा पारायण करावे.
- शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र म्हणावे.
- आपल्या कुलदेवतेची जी शक्य असेल, ती उपासना करावी.