चिंताजनक! कोरोना रुग्णांना रुग्णालयातून हॉटेलमध्ये केलं जाणार शिफ्ट; "हे" आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 12:10 PM2021-01-14T12:10:45+5:302021-01-14T12:26:58+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 9 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इंग्लंडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण दिवसागणिक वाढत आहे.

देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा करत असतानाच रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आता सरकार कोरोना रुग्णांना रुग्णालयांमधून मोठ्या हॉटेलमध्ये हलवण्याचा विचार करत आहे.

आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी सरकार नवीन पर्यायांचा विचार करत आहे. यामध्ये रुग्णांना हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्याच्या पर्यायावरही विचार सुरु असल्याचं हॅनकॉक यांनी म्हटलं आहे.

आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी करण्यासाठी जो कोणता पर्याय निवडला जाईल तो वैद्यकीय दृष्ट्या रुग्णांसाठी फायद्याचा असेल तरच विचार करण्यात येईल असंही हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे.

काही रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करुन घेण्याइतकी गंभीर अवस्था नसते. म्हणजेच अशा रुग्णांना सतत रुग्णालयातील बेडवर पडून राहण्याची गरज नसते. अशांना हॉटेलमध्ये हलवण्यात येऊ शकतं असं देखील हॅनकॉक यांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. कोरोनामुळे 83 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहिल्यास सध्या ब्रिटन हा संपूर्ण युरोपमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांमध्ये बेड्स कमी पडत आहेत. इंग्लंडमधील रुग्णालयांमध्ये सध्या एप्रिलच्या तुलनेत 55 टक्के अधिक कोरोना रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डिसेंबरमध्ये कोरोनाच्या नियमांमध्ये सूट देण्यात आल्यानंतर आणि कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडल्याने ब्रिटनमधील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली. रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचारांसाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी क्रिस व्हिट्टी यांनी देश कोरोना संकटाला तोंड देताना सर्वात वाईट काळामधून जात असल्याचं म्हटलं आहे. ब्रिटनमधील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचेही व्हिट्टी यांनी सांगितलं.

वाईट परिस्थिती फेब्रुवारी महिन्यामध्ये असू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 92,778,983 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1,986,903 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत.