होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:26 IST2026-04-16T11:22:34+5:302026-04-16T11:26:18+5:30

अमेरिका-इस्रायलनं संयुक्तपणे इराणवर हल्ला केल्यानंतर इराणने होर्मुझमधील जहाजांची वाहतूक रोखली. स्ट्रेट होर्मुझ हा असा जलमार्ग आहे जिथून जगातील २० टक्के तेल आणि गॅस व्यापार होतो. इराणने होर्मुझमध्ये दिलेल्या धमकीमुळे जहाजांची वाहतूक थांबली आणि जागतिक ऊर्जा संकटाचा सामना अनेक देशांना करावा लागला.

आता चीन होर्मुझच्या सामुद्रधुनीपेक्षाही मोठा सागरी मार्ग रोखण्याची तयारी करत आहे. फिलीपिन्स आणि जपानसोबतच्या वादांच्या पार्श्वभूमीवर चीनने दक्षिण चीन समुद्राचे प्रवेशद्वार अंशतः रोखण्याची तयारी सुरू केली आहे. चीन या प्रवेशद्वारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चीनने स्कारबोरो शोलजवळ जहाजे तैनात केली आहेत. चीन जहाजांचा वापर करून हे प्रवेशद्वार बंद करू शकतो.

रॉयटर्सने घेतलेल्या सॅटेलाइट इमेजद्वारे हा खुलासा झाला आहे. या फोटोत कशाप्रकारे चीनने दक्षिण चीन समुद्राच्या प्रवेशद्वारावर कसा अडथळा निर्माण केला आहे, जेणेकरून कोणतेही जहाज त्यांच्या निगराणीशिवाय या मार्गातून सहजपणे जाऊ शकत नाही हे पाहायला मिळते.

Ventor सॅटेलाइट इमेजमधून जो फोटो समोर आला आहे. त्यानुसार चीन दक्षिण चीन सागरातील प्रवेशद्वाराला ब्लॉक करण्यासाठी एक बॅरिकेड, एक जहाज आणि चार मासेमारी करणाऱ्या बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यातून संपूर्ण परिसर ब्लॉक होईल

माहितीनुसार, चीनने उचललेल्या या पावलामुळे प्रादेशिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या प्रदेशावर फिलीपिन्स आपला आधीपासून दावा करत आहे. परंतु बॅरिकेड्सबाबत चीनकडून कुठलेही अधिकृत विधान अथवा निवेदन समोर आले नाही.

चीनने या भागात ३५२ मीटर उंचीचा अडथळा उभारला आहे. इतकेच नाही तर चीनने तिथे सहा पाणबुड्या तैनात केल्या आहेत. चीनला त्या भागावर संपूर्ण नियंत्रण मिळवायचे आहे असा आरोप फिलीपिन्स तटरक्षक दलाचे प्रवक्ते जय टॅरिएला यांनी केला आहे.

जागतिक व्यापारापैकी ३३ टक्के व्यापार दक्षिण चीन समुद्रातून होतो. हा मार्ग रोखल्यास किंवा त्यावर नियंत्रण मिळवल्यास मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर त्याचे पडसाद उमटू शकतात. सिंगापूर, फिलीपिन्स, जपान, चीन आणि तैवानसारखे देश या मार्गाद्वारे आपला व्यापार करतात.

चीनने इथल्या बेटाच्या बहुतांश भागावर आधीच कब्जा केला आहे परंतु अलीकडे कृत्रिम बेटे बांधून चीन त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने दक्षिण चीन समुद्राच्या प्रवेशद्वारावर ज्या पद्धतीने अडथळे उभे केले आहेत त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. चीन त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलीपिन्सचा दावा मान्य केला आणि हे बेट चीनचे नाही असं घोषित केले.

चीन असा देश आहे जो सतत शेजारील देशांच्या कुरापती काढत राहतो, त्यांच्या सीमांचे उल्लंघन करायचे, शेजारी देशांच्या आत जाऊन ठाण मांडायचे आणि मग देवाणघेवाणीची भाषा करून काही ना काही तरी पदरात पाडून घ्यायचे ही चीनची सर्वपरिचित नीती आहे.

संपूर्ण दक्षिण चीन सागर घशात घालण्याचे चीनचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. एकूण २३ देशांच्या भूप्रदेशांवर चीन दावा करतो. चीनचे हे विस्तारवादी धोरण आजचे नाही. मात्र चीनच्या या धोरणांमुळे बऱ्याचदा प्रादेशिक तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आहे.