Lionel Messi's special World Cup boots : कुछ खास है! लिओनेल मेस्सीचा विक्रम अन् चर्चा त्याच्या बुटांची, असं काय लिहिलंय त्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 11:22 AM2022-11-27T11:22:15+5:302022-11-27T11:25:07+5:30

Lionel Messi's special World Cup boots - अर्जेंटिनाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी मेक्सिकोवर २-० असा विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

Lionel Messi's special World Cup boots - अर्जेंटिनाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी मेक्सिकोवर २-० असा विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले. लिओनेल मेस्सी संकटमोचक ठरला.. त्याने दुसऱ्या हाफमध्ये अप्रतिम गोल केलाच, शिवाय दुसऱ्या गोलसाठी सहाय्य करून प्लेअर ऑफ दी मॅच ठरला.

सौदी अरेबियाकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनावर दडपण होते आणि ते जाणवलेही. पहिल्या हाफमध्ये मेक्सिकोने त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि उल्लेखनीय खेळ करताना दोन वेळच्या विजेत्यांना कडवी झुंज देण्यास भाग पाडले.

मेस्सीने दुसऱ्या हाफमध्ये कमाल केली आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास परत मिळवला. अर्जेंटिनाने २००४नंतर मेक्सिकोविरुद्धची ११ सामन्यांत ( ८ विजय व ३ अनिर्णित) अपराजित मालिका कायम राखली. वर्ल्ड कप स्पर्धेतील मेक्सिकोचा हा अर्जेंटिनाविरुद्धचा चौथा पराभव ठरला. अर्जेंटिनाने नायजेरियाला सर्वाधिक ५ वेळा पराभूत केले आहे.

६४व्या मिनिटाला मेस्सीने पहिला गोल करून दिग्गज दिएगो मॅरेडोना यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील मेस्सीचा हा आठवा गोल ठरला, मॅरेडोना यांनीही वर्ल्ड कपमध्ये ८ गोल केले आहेत. आता केवळ गॅब्रिएल बॅटीस्टुटा ( १०) हे अर्जेंटिनाकडून सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आहेत.

८७ व्या मिनिटाला मेस्सीच्या मदतीने एंझो फर्नांडेसने गोल करून अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी भक्कम केली. २१ वर्ष व ३१३ दिवसांचा फर्नांडेस हा अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कप सपर्धेत गोल करणारा मेस्सीनंतर ( २००६ साली, १८ वर्ष व ३५७ दिवस ) युवा खेळाडू ठरला आहे.

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप स्पर्धेतील सात सामन्यांत प्रथमच क्लीन शीट ठेवली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध गोलशून्य बरोबरी ठेवली होती. अर्जेंटिनासाठी मेस्सीने सलग सहाव्या सामन्यात गोल केला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये ( ६ नोव्हेंबर २०११ ते सप्टेंबर २०१२) त्याने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.

C गटात पोलंड ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर अर्जेंटिना व सौदी अरेबिया यांच्या खात्यात प्रत्येकी ३ गुण आहेत. मात्र, गोल फरकामुळे अर्जेंटिनाची बाजू वरचढ आहे. सौदी अरेबियाला काल पोलंडने २-० असे पराभूत केले होते. अर्जेंटिनाचा पुढील सामना पोलंडविरुद्ध आहे आणि त्यात त्यांना विजय मिळवून पुढील फेरीत जाता येईल

मेस्सीने पराक्रम केला असताना चर्चा त्याच्या बुटाची सुरू झालीय. UEFA Champions Leagueने मेस्सीच्या बुटांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

गोल्डन रंगाच्या या बुटांवर मेस्सीचा जर्सी क्रमांक दिसतोय, परंतु त्याचवेळी मेस्सीने त्याची मुलं थिएगो व माटीओ यांची नावं व जन्मतारीख त्यावर लिहिली आहे. त्यामुळेच मेस्सीच्या बुटांची चर्चा सुरू आहे. मेस्सी तसा कुटुंबवत्सल व्यक्ती आहे.