पगार येतो अन् जातो कुठे कळतच नाही!"; लाखो कमवूनही बचत शून्य असणाऱ्यांसाठी खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:42 IST2026-05-04T10:25:57+5:302026-05-04T10:42:27+5:30
समाजात वावरताना ज्याचा पगार मोठा, तोच सर्वांत श्रीमंत असे समीकरण आपण मानतो. आलिशान घर, महागडी गाडी आणि परदेश वाऱ्या पाहून अनेकांना याचा हेवा वाटतो.

समाजात वावरताना ज्याचा पगार मोठा, तोच सर्वांत श्रीमंत असे समीकरण आपण मानतो. आलिशान घर, महागडी गाडी आणि परदेश वाऱ्या पाहून अनेकांना याचा हेवा वाटतो. मात्र, चकचकीत आयुष्याच्या पडद्यामागे एक धक्कादायक वास्तव दडलेले असते.

अनेक उच्चभ्रू व्यावसायिकांचा पगार लाखांत असूनही त्यांची 'नेटवर्थ' (निव्वळ संपत्ती) मात्र अत्यंत कमी असल्याचे समोर आले आहे. उत्पन्न आणि बचत यांच्यातील व्यस्त प्रमाण हे याचे मुख्य कारण ठरत आहे.

उत्पन्न म्हणजे संपत्ती नव्हे हे लक्षात घ्या बहुतेक लोक 'सॅलरी' आणि 'नेटवर्थ' यामध्ये गल्लत करतात. पगार हे तुमचे दरमहाचे उत्पन्न आहे, तर नेटवर्थ ही तुमची खरी आर्थिक ताकद आहे. पगारातील मोठा हिस्सा जर केवळ खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडण्यात जात असेल, तर आर्थिक स्थिती कागदावरच भक्कम दिसते.

'लाइफस्टाईल अपग्रेड'चा सापळा जसा पगार वाढतो, तशी मानवी गरजांची व्याप्तीही वाढते. करिअरमध्ये बढती मिळाली की लगेच मोठे घर, लक्झरी कार आणि महागड्या वस्तूंची खरेदी सुरू होते. हे खर्च गुंतवणुकीसाठी संधीच शिल्लक ठेवत नाहीत. त्याने, मोठी सॅलरी असूनही बॅलन्स शीट रिकामीच राहते.

कर्जाचा विळखा आणि विखुरलेली गुंतवणूक उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींकडे देणीही तितकीच मोठी असतात. अनेक जण गुंतवणुकीचे निर्णय नियोजनपूर्वक न घेता कोणाच्या तरी सांगण्यावरून शेअर्समध्ये पैसे टाकतात. दीर्घकालीन पोर्टफोलिओ नसल्यामुळे संपत्तीत हवी तशी वाढ होत नाही.

आर्थिक स्वातंत्र्याला मुकण्याची भीती जेव्हा एखादी व्यक्ती केवळ पगारावर अवलंबून राहून आपली जीवनशैली ठरवते, तेव्हा ती एक प्रकारे 'सोनेरी पिंजऱ्यात' अडकते. निव्वळ संपत्ती कमी असल्यामुळे त्यांना नाइलाजाने नावडती नोकरी करत राहावी लागते, कारण त्यांच्याकडे पर्यायी आर्थिक सुरक्षा कवच नसते.

खरी श्रीमंती काय?: तज्ज्ञांच्या मते, पगारातून मिळणाऱ्या पैशांचे मालमत्तेत रूपांतर करणे हीच खरी श्रीमंती आहे. अनावश्यक खर्च टाळून आणि कर्जाचे ओझे कमी करूनच तुम्ही तुमचे उत्पन्न खऱ्या संपत्तीत बदलू शकता.

















