नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:22 IST2026-04-17T11:09:13+5:302026-04-17T11:22:03+5:30
Akshaya Tritiya 2026 Donation: अक्षय्य तृतीयेला नेमक्या कोणत्या गोष्टींचे दान करावे? जाणून घ्या...

Akshaya Tritiya 2026: वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी जे काही केले जाते, ते अक्षय्य होते. हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा, रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीया आहे.

कृत अथवा त्रेता युगाची सुरुवात याच तिथीने सुरू झाली, असे मानतात. भविष्यपुराणात अक्षय्य तृतीयेचे व्रत सांगितले आहे. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रह प्रतिकूल असेल किंवा महादशा, अंतर्दशेत नकारात्मक प्रभाव पडत असेल, तर अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने काही गोष्टींचे आवर्जून दान करावे असे म्हटले जात आहे.

अक्षय्य तृतीयेला केलेले दान अनेक पटींनी वाढते. सुख, समृद्धी व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या शुभ दिवशी नऊ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी विशेष दान आणि उपाययोजना केल्या जातात. या दिवशी ग्रहांशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने नवग्रह शांत होतात. कुंडलीतील ग्रहदोषांचे नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात, असे म्हटले जाते.

नवग्रहांचा राजा सूर्य कुंडलीत कमकुवत किंवा अशुभ स्थानी किंवा स्थितीत असेल, तर व्यक्तीचा मान, प्रतिष्ठा आणि संपत्ती कमी होऊ शकते. सूर्य तेज वाढवण्यासाठी लाल वस्त्रे, गहू, गूळ, दूध, तांबे, तूप, डाळी यांचे दान करावे याने घरात शांतता व आनंद नांदतो. आत्मविश्वास वाढतो, असे म्हटले जाते.

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कमकुवत किंवा अशुभ स्थानी किंवा स्थितीत असेल, तर बुध ग्रहाला मजबूत करण्यासाठी चांदी, पितळेची भांडी, हिरव्या रंगाचे कपडे, मूग आणि हिरव्या भाज्यांचे दान करणे फायदेशीर ठरते. याने बुद्धिमत्ता, एकाग्रता वाढते. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होते.

नवग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळ ग्रहाचे स्थान बळकट करण्यासाठी लाल वस्त्रे, डाळी, लाल चंदन, लाल फुले, मिठाई, तांबे, मातीची भांडी दान करावीत. याने धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता वाढू शकते, असे सांगितले जाते.

नवग्रहांचा गुरू बृहस्पती म्हणजेत गुरु ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र, मिठाई, केळी, तूप आणि हरभरा डाळ दान करणे हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, ज्ञान आणि संपत्ती येऊ शकते, असे सांगतात.

नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनि ग्रहाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे कपडे, धान्य आणि काळी छत्री दान करावी. शनि दोष आणि साडेसातीचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात, असे सांगितले जाते.

नवग्रहातील शुक्र ग्रहाला बलवान करण्यासाठी दूध, दही, साखर, खरबूज, सत्तू, पांढरे चंदन, अत्तर आणि इतर पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येऊ शकतो, असे म्हटले जाते.

नवग्रहातील चंद्राला बलवान करण्यासाठी दूध, दही, साखर, खीर, मोती, शंख आणि शुभ्र वस्त्रे दान करणे शुभ मानले जाते. मन शांत होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

अक्षय्य तृतीयेचा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
















