सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:46 IST2026-04-17T12:45:49+5:302026-04-17T12:46:25+5:30
या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून,याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे ७ कोटी रुपये असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे.

सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात
सावंतवाडी : दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या किंमतीची ब्लू व्हेल माशाची उलटी म्हणजेच ‘अंबरग्रीस’ची बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या पथकाने उलथून लावत मुद्देमाल सह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई गुरूवारी सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे वनविभागाकडून करण्यात आली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून,याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे ७ कोटी रुपये असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे.
शिरोडा परिसरात काही व्यक्तीकडे अंबरग्रीसची असल्याची माहिती वनविभागाला लागली होती त्यामुळे वनविभागाकडून कुडाळ वनविभागातील एक कर्मचारी ग्राहक म्हणून तयार करून पाठवला होता हा ग्राहक संशयित आरोपी कडे जाऊन ब्लू व्हेल प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) आपण विकत घेणार असून आपणास योग्य किंमत सांगा असे सांगून त्यांच्याशी चर्चा केली व त्याना विक्रीस प्रवृत्त केले.त्यानंतर वनविभागाच्या फिरते पथकाने सापळा रचत उलटीची विक्री करत असतना चौघांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये रणजित रामचंद्र नायर, (४० रा. परबगाव शिरोडा), गुरुनाथ नाईक (७० वर्षे रा. परबगाव शिरोडा), विभव आडारकर, (३५ वर्षे, रा. शिरोडा ता. वेंगुर्ला) आणि निलेश मनोहर पांडजी ( ३३ वर्षे, रा. रेडी. ता. वेंगुर्ला) यांचा समावेश असून त्यांना रितसर अटक करण्यात आलेली आहे.
दरम्यान आरोपींकडून ९.१२० कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आलेल आहे. अंबरग्रीस आरोपी १ ते ४ यांना सुमारे ७ कोटी रुपये किंमतीचे असून त्याची विक्री करावयाची होती. ब्लू व्हेल माशाची उलटीस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी व किंमत असल्याने पैशांच्या लोभापायी अशा स्वरूपाचे वनगुन्हे सध्या उघडकीस येत आहेत. असे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
ही कारवाई सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा याच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनअधिकारी संजय वाघमोडे सहाय्यकवनसंरक्षक. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यात फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे वनक्षेत्रपाल अमित कटके, वनपाल सावळा कांबळे, वनपाल महेश पाटील, ब्रम्हकुमार भोजने, संग्राम पाटील, अनिकेत माने, वनरक्षक माणगाव, श्री रविंद्र पाटील, वनरक्षक फिरते पथक, रिषीका होले, नितीन सावंत, चालक वनविभाग यांनी केली आहे.