भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:54 IST2026-04-17T14:52:46+5:302026-04-17T14:54:07+5:30
या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढे येणार असल्याने त्यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर - भोंदू अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टमधील उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात शेळके यांचे निधन झाले. जितेंद्र शेळके यांच्या निधनाने हा अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने येताना शेळके यांची कार कंटनेरच्या मागच्या बाजूस धडकली. ही धडक इतकी भीषण होती की जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. धोत्रे गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात शेळके यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी असल्याचं समोर आले आहे. जितेंद्र शेळके हे शिर्डी येथील महत्त्वाच्या जमीन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार होते. ते अशोक खरात प्रकरणात तणावात असल्याचेही बोलले जाते. जितेंद्र शेळके हे वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते.
तर शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि भोंदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढे न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढे येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच भोंदू खरातच्या चौकशीतही अनेक बाबी पुढे येणार असल्याने त्यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, जितेंद्र शेळके यांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय वाटते. गेल्या अनेक दिवसांपासून खरातच्या जीवाला धोका असू शकतो अशी शक्यता आणि भीती काही नेत्यांनी वर्तवली होती. आजच्या घटनेने ही शक्यता अधिक स्पष्ट अधोरेखित होते. कदाचित खरात प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये असं काही लोकांना वाटत असेल. एसआयटी अजूनही या प्रकरणातील तपासाची गती वाढवत नसेल. लोकांची चौकशी होत नसेल तर अजून जास्त संशयाचे धुके वाढत चालले आहे. शेळके हा गुन्हेगार होता की नव्हता हे कायद्याने ठरवले असते. कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार कुणाला नाही. पण आज जी घटना घडली ती तपास यंत्रणा, शासन व्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे अशी टीका उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
खरात प्रकरणातील शिवनीका ट्रस्टचा संचालक शेळके याचा अपघाती मृत्यू धक्कादायक आहे.
— SushmaTai Andhare (@andharesushama) April 17, 2026
खरात चा एन्काऊंटर होऊ शकतो ही अनेकांनी व्यक्त केलेली शंका यानिमित्ताने अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. pic.twitter.com/Z78P9TfDr2