Latest Marathi News LIVE: मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:47 IST2026-03-17T10:30:38+5:302026-03-17T19:47:18+5:30

इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेलं युद्ध काहीसं भरकटल्यासारखं दिसत आहे. युद्धाचं नेमकं कारण, त्याची आखणी, लक्ष्य, हे काहीच निश्चित नसल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे.

Maharashtra Marathi News Live Updates 17 March 2026: US Israel Iran War, Parliament Session, Rajya Sabha Election, Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, LPG Shortage in India, Donald Trump | Latest Marathi News LIVE: मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

Latest Marathi News LIVE: मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

Latest Maharashtra Marathi News Live Updates 17 March 2026: इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेलं युद्ध काहीसं भरकटल्यासारखं दिसत आहे. युद्धाचं नेमकं कारण, त्याची आखणी, लक्ष्य, हे काहीच निश्चित नसल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे. हल्ले-प्रतिहल्ले, इशारे-प्रतिइशारे सुरूच आहेत आणि त्यातून तोडगा कसा निघेल, कधी निघेल आणि कोण काढेल, याबद्दल काहीच स्पष्टता नाही. इराणने मध्य-पूर्वेतील हल्ले काहीसे कमी करून कूटनीतीचा मार्ग अवलंबल्याचं चित्र आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना मित्रराष्ट्रांचा हवा तसा पाठिंबा मिळत नसल्यानं त्यांची कोंडी झाली आहे. या दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना मार्ग मोकळा झाल्यानं एलपीजी संकटात थोडा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. विविध राज्यांमध्ये गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत या विरोधकांच्या ऐक्याला तडा गेल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात, धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तिथेही महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये एकमत नसल्याचं दिसलं.  या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

17 Mar, 26 : 07:46 PM

अहिल्यानगरमध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला; दोन दिवसांत दुसरी घटना

अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला करुन पळ काढला.  या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

17 Mar, 26 : 04:39 PM

कोल्हापूर जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध

 कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध पार पडली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या शिल्पा शशिकांत खोत यांची अध्यक्षपदी, तर भाजपचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

17 Mar, 26 : 04:21 PM

Mumbai Local Train Update: मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटीला येणाऱ्या लोकल अर्ध्यातासापासून ठप्प

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटीला येणाऱ्या लोकल अर्ध्यातासापासून ठप्प झाल्या आहेत. भायखळा आणि चिंचपोकळी स्थानकांदरम्यान लोकल रखडल्याने खोळंबा झाला आहे

17 Mar, 26 : 04:12 PM

जालना : खरपुडीतील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांना भेट

जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील सिडको बाधित शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित सिडको प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. नवनगर सिडको प्रकल्पासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करून जमीनधारकांना योग्य मोबदला द्यावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. पुढील दोन दिवसांत प्रक्रिया सुरू न झाल्यास आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

17 Mar, 26 : 03:48 PM

शिंदे गटाचे ‘हाय कमांड’ दिल्लीत, अमित शाह त्यांचे बॉस; संजय राऊतांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे गटाचे ‘हाय कमांड’ मुंबईत नसून दिल्लीत असल्याचा आरोप राऊतांनी केला. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे जरी ‘शिवसेना’ हे नाव वापरत असले तरी, त्यांच्या पक्षाची स्थापना प्रत्यक्षात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. अमित शाह हेच त्यांचे बॉस आहेत. ते दिल्लीत बसतात आणि शिंदे त्यांच्याकडून आदेश घेण्यासाठीच भेटायला जातात, असा टोला राऊत यांनी लगावला.

17 Mar, 26 : 03:26 PM

मूल दत्तक घेणाऱ्या सर्व महिलांना मातृत्व रजा मिळायलाच हवी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने दत्तक मातांच्या हक्कांबाबत ऐतिहासिक निर्णय देत सोशल सिक्युरिटी कोड, 2020 मधील कलम 60(4) रद्द केले आहे. या कलमानुसार केवळ तीन महिन्यांखालील बालक दत्तक घेतल्यासच मातृत्व रजा मिळत होती. न्यायालयाने हा भेदभाव असंवैधानिक ठरवत सर्व दत्तक मातांना 12 आठवड्यांची रजा देण्याचे निर्देश दिले आहेत.

17 Mar, 26 : 03:14 PM

उद्या पेपर अन् आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची केली चोरी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. या दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे.   सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची स्ट्राँग रूम फोडून भूगोलाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या आधी गणिताचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले होते.
 

17 Mar, 26 : 02:59 PM

४०० लोक ठार, २५० जखमी; पाकने केलेल्या हल्ल्यानंतरचा भयानक व्हिडीओ

अफगाणिस्तानातील काबूलमध्ये असलेल्या एका पुनर्वसन रुग्णालयावरच पाकिस्तानने हवाई हल्ला केला. रमजानच्या काळातच केलेल्या या निर्दयी हल्ल्यात तब्बल ४०० लोक मारले गेले आहेत, तर २५० लोक जखमी झाले आहेत. 

पाकिस्ताने केलेल्या हल्ल्यात रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर उद्ध्वस्त झाला आहे. हल्ल्यानंतरची दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत. 

17 Mar, 26 : 02:50 PM

सोलापूर : उद्या होणारा दहावी परीक्षेचा भूगोलाचा पेपर फुटला

 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान सांगोला शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम'  फोडून भूगोलाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेला आहे.

17 Mar, 26 : 02:29 PM

इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार?

या आठवड्यामध्ये इराण युद्ध थांबू शकते का? असा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला. व्हाईट हाऊसमध्ये ते पत्रकारांशी संवाद करत होते. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी इराण युद्ध लवकरच थांबेल असे सांगितले. (सविस्तर वाचा)

17 Mar, 26 : 02:28 PM

'त्या' 8 खासदारांचे निलंबन मागे; जाणून घ्या भाजप-काँग्रेसच्या 'सीजफायर'ची INSIDE STORY

लोकसभेत अध्यक्षांच्या आसनावर कागद फाडून फेकल्याच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षातील आठ खासदारांचे निलंबन अखेर रद्द करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात झालेल्या चर्चेनंतर ‘सीजफायर’ झाल्याने संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, जो ध्वनिमताने मंजूर झाला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी तत्काळ प्रभावाने निलंबन समाप्त झाल्याची घोषणा केली.

17 Mar, 26 : 02:19 PM

"माझ्यावर हल्ला झाल्यास पंतप्रधान, भाजपाचे सर्व नेते जबाबदार..."

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज एका जाहीर सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, "माझ्यावर हल्ला होऊ शकतो आणि जर असं झालं, तर पंतप्रधानांपासून भाजपाच्या सर्व नेत्यांपर्यंत सर्वजण याला जबाबदार असतील." यावेळी त्यांनी भाजपा खासदार दिलीप घोष यांच्या एका विधानाचा उल्लेख केला. ही सर्व प्रक्षोभक विधानं असून, भविष्यात अशा विधानांमुळेच आपल्यावर हल्ला होऊ शकतो, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. वाचा सविस्तर

17 Mar, 26 : 01:30 PM

आता चर्चा नाही, बदला घेणार; पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानची मोठी घोषणा...

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहेत. पाकिस्तानने काबूलमधील एका रुग्णालयावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे. या हल्ल्यामुळे तालिबान सरकार प्रचंड नाराज असून, तणाव कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. या हल्ल्यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 250 जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या वेळी या केंद्रात सुमारे 2000 लोक उपस्थित होते. अनेक जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

17 Mar, 26 : 12:58 PM

धुळे जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवडा; सामाजिक संघटना आक्रमक, ऑनलाईन बुकिंग व होम डिलिव्हरीची मागणी

धुळे जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात संविधान संरक्षण समितीने थेट राज्य सरकारकडे निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

17 Mar, 26 : 12:41 PM

होर्मुझहून ४७,००० मेट्रिक टन LPG घेऊन 'नंदा देवी' जहाज मायदेशी परतले

गेल्या काही दिवसांपासून देशात जाणवणारा एलपीजी (LPG) तुटवडा आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'शिवालिक' या जहाजानंतर आता 'नंदा देवी' हे दुसरे अजस्त्र जहाज ४७,००० मेट्रिक टनांहून अधिक गॅस घेऊन गुजरातच्या वडीनार बंदरात सुखरूप दाखल झाले आहे. मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे. (सविस्तर वाचा)

17 Mar, 26 : 12:35 PM

13 जागा मिळवूनही भाजप राज्यसभेत बहुमतापासून दूर

Rajyasabha Election 2026 : देशभरातील 10 राज्यांमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय झाला आहे. एनडीएने 37 जागांपैकी 22 जागांवर विजय मिळवत वरच्या सभागृहातील आपली ताकद वाढवली आहे. मात्र, या मोठ्या यशानंतरही भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवण्यासाठी अजूनही 16 जागांची आवश्यकता आहे.

17 Mar, 26 : 12:29 PM

आखाती देशांतील युद्धाचा परिणाम अंडी दरावर; दोन रुपयांनी दर घसरल्याने उत्पादक चिंतेत

आखाती देशांतील युद्ध आणि वाढत्या उन्हाचा परिणाम अंडी दरावर झाला आहे. अंड्याचे दर दोन रुपयांनी घसरल्याने सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
 

17 Mar, 26 : 11:46 AM

जालन्यात गॅस गोडाऊन फोडून ११० सिलिंडर चोरी; रामनगर परिसरात खळबळ

जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस गोडाऊन फोडून तब्बल एकशे दहा सिलिंडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंद भारत गॅस गोडाऊनमध्ये घडलेल्या या प्रकारात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत १४ किलोचे ९६, ५ किलोचे २ आणि १९ किलोचे १२ असे एकूण सिलिंडर लंपास केले आहेत. या चोरीत चार लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

17 Mar, 26 : 11:23 AM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. ही भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी आहे याची माहिती समोर आलेली नाही.

17 Mar, 26 : 11:09 AM

काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी

अफगाणिस्तानच्या सरकारी प्रवक्त्यांनी मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांची संख्या वाढून ४०० झाल्याचं म्हटलं आहे. हमदुल्ला फितरत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं की, सोमवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४०० लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे २५० जण जखमी झाले आहेत.  वाचा सविस्तर

17 Mar, 26 : 11:05 AM

८१,००० टन कच्चे तेल घेऊन जग लाडकी भारतात पोहोचणार

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे भारताच्या गॅस आयातीवर परिणाम झाला असून, दोन जहाजे भारतात दाखल झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवालिक आणि नंदा देवी हे दोन्ही जहाजे ९२ लाख मेट्रीक टन गॅस घेऊन भारतात दाखल झाले. 

आता तिसरे जहाज जग लाडकी आज (१७ मार्च) भारतातील मुंद्रा पोर्टवर दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. 

८१ हजार टन कच्चे तेल घेऊन जग लाडकी जहाज शनिवारी निघाले होते. ते १७ मार्च रोजी भारतात पोहोचणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह या बंदरावरून हे जहाज निघाले. हे जहाज बंदरावरून निघत असताना इराणने या पोर्टवर हल्ला केला होता. 

17 Mar, 26 : 10:54 AM

हरीश राणाचा मृत्यूकडे प्रवास सुरु!

दिल्लीतीलएम्स रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि अंतिम टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली हरीश यांची जीवन रक्षक उपकरणे टप्प्याटप्प्याने हटवण्याची प्रक्रिया पुढे नेली जात आहे. तसेच आजपासून हरीश राणाचे पाणी बंद करण्यात येत आहे.  (सविस्तर वाचा)

17 Mar, 26 : 10:54 AM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला

 राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. ही भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी आहे याची माहिती समोर आलेली नाही.

17 Mar, 26 : 10:50 AM

काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी

अफगाणिस्तानच्या सरकारी प्रवक्त्यांनी मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांची संख्या वाढून ४०० झाल्याचं म्हटलं आहे. (सविस्तर वाचा)

17 Mar, 26 : 10:49 AM

युद्धाच्या पहिल्या दिवसांत डागत होता शेकडो मिसाईल

इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमतेबाबत एक मोठी आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेने इराणचे सुमारे ९०% क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जात असला तरी, इराणची 'हल्ला करण्याची क्षमता' अद्याप पूर्णपणे संपलेली नाही, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. (सविस्तर वाचा)

17 Mar, 26 : 10:48 AM

जालना : गॅस गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल एकशे दहा गॅस सिलिंडर लंपास

जालना जिल्ह्यातील रामनगर परिसरात मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे. रामनगर येथील आनंद भारत गॅस गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल एकशे दहा गॅस सिलिंडर लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही चोरी चौदा ते सोळा मार्च दरम्यान रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.

17 Mar, 26 : 10:48 AM

नवी मुंबईत बनावट शेअर बाजार कॉल सेंटरचा पर्दाफाश

नवी मुंबईतील महापे परिसरात शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायबर पोलीस आणि आर्थिक गुप्तचर विभागाने संयुक्त कारवाई करत या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून अनेक संशयितांचा शोध सुरू आहे.
महापे येथील आलिशान इमारतीतून सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून देशभरातील लोकांना फोन आणि संदेशांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखवले जात होते. या प्रकरणात आतापर्यंत एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

17 Mar, 26 : 10:47 AM

बुलढाणा : गॅस संपल्याने हिवरा आश्रम येथील गुरुकुल मधील तीन हजार विद्यार्थ्यांचा स्वयंपाक चुलीवर

 आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा देशभरात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने याचा फटका आता गाव खेड्यातही बसताना दिसतोय, बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे जवळपास सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यापैकी तीन हजार विद्यार्थी हे गुरुकुल मध्ये राहतात, त्यांचे दररोज दोन वेळचे जेवण हे आता चुलीवर बनवावे लागत आहे.. वाढते तापमान आणि चुलीवर तयार करण्यात येणारे जेवण शिवाय होणाऱ्या धुरामुळे ही महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे तात्काळ गॅस चा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी स्वयंपाकी महिलांकडून केला जातेय.

17 Mar, 26 : 10:47 AM

आझाद मैदानावर बांधकाम कामगारांचा एल्गार

मुंबईतील आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असून मुख्यमंत्री यांना निवेदनही देण्यात आले आहे. संघटनेच्या मते, बांधकाम कामगारांचे सुमारे २० लाख अर्ज प्रलंबित असून ते तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आहे.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 17 March 2026: US Israel Iran War, Parliament Session, Rajya Sabha Election, Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, LPG Shortage in India, Donald Trump