Trump on Iran: इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:21 IST2026-03-17T13:18:24+5:302026-03-17T13:21:07+5:30
Donald Trump on Iran war: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरु असलेले युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना एक मोठे विधान केले.

Trump on Iran: इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही'
Iran war Donald Trump Latest News: या आठवड्यामध्ये इराण युद्ध थांबू शकते का? असा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला. व्हाईट हाऊसमध्ये ते पत्रकारांशी संवाद करत होते. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी इराण युद्ध लवकरच थांबेल असे सांगितले.
इराणवर २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर युद्ध पेटले. गेल्या १७ दिवसांपासून युद्ध सुरू असून, त्याचा शेवट कधी होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. इराण युद्धामुळे आखाती देशांवरही परिणाम झाला आहे. तेल, गॅस पुरवठ्याच्या साखळीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे युद्ध लवकर थांबवण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
याच आठवड्यात युद्ध थांबणार?
ट्रम्प यांना पत्रकारांनी जेव्हा या आठवड्यात युद्ध थांबेल का असे विचारले. तेव्हा ते म्हणाले की, 'होय. नक्कीच.'
त्यानंतर त्यांना पुन्हा विचारण्यात आलं की, खरंच या आठवड्यात युद्ध थांबेल का? त्यावर ट्रम्प म्हणाले, 'मला असे वाटत नाही. पण, लवकरच युद्ध थांबेल. त्याला जास्त वेळ लागणार नाही.'
इराणची क्षेपणास्त्रे नष्ट झालीये
ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'इराणची क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) बऱ्याच प्रमाणात नष्ट झाली आहेत. त्यांच्याकडे आता खूप कमी क्षेपणास्त्रे राहिली आहेत. ब्रिटन आणि नाटो सदस्य देश या युद्धात अमेरिकेची साथ देण्यास घाबरत आहेत.'
अमेरिकेच्या इराकमधील दूतावासावर अनेक हल्ले
रॉयटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराकची राजधानी बगदादमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन्स आणि रॉकेट डागण्यात आले.
इराकमधील सरंक्षण विभागातील सूत्रांनी एएफपीला सांगितले की, गेल्या काही दिवसांत दूतावासावर झालेल्या हल्ल्यांपैकी हा सर्वात मोठा हल्ला होता. हल्ला होण्याच्या सहा तास आधी इराकच्या यंत्रणांनी दूतावासातील नागरिकांना अलर्ट केले होते.'
युद्धात अमेरिकेच्या १३ जवानांचा मृत्यू
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेच्या १३ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर या लष्करी संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांचा आकडा २०० वर पोहोचला आहे.
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लोकांचे जीव गेले आहेत. ह्युमन राइट्स एक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, एकूण मृतांमध्ये १,३५१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १,१२६ सैनिक मारले गेले आहेत.
लेबनानमध्येही आतापर्यंत ८८६ लोक युद्धामुळे मारले गेले आहेत. मृतांमध्ये ६६ महिला आणि १११ लहान मुलांचा समावेश आहे.