भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहातील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. सर रतन टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असल्यची माहिती समोर आलीये. हा संपूर्ण वाद तब्बल साडेतीन दशकं जुन्या एका शेअर ट्रान्सफर प्रकरणाशी संबंधित आहे.
काय आहे नेमका वाद?
हा वाद 'नवाजबाई रतन टाटा ट्रस्ट'च्या मालकीच्या टाटा सन्सच्या ८३३ इक्विटी शेअर्सशी संबंधित आहे. नोटीसमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, जानेवारी १९८९ मध्ये हे शेअर्स एका चॅरिटेबल ट्रस्टकडून काढून दिवंगत नवल एच. टाटा यांच्या वैयक्तिक नावावर हस्तांतरित करण्यात आले होते. हा व्यवहार अवैध असल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे ट्रस्टचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
नोटीसमध्ये करण्यात आलेले गंभीर आरोप
१. अवैध हस्तांतरण: १८ जानेवारी १९८९ रोजी ट्रस्टची ही संपत्ती नवल टाटा यांच्या नावावर करण्यात आली. विशेष म्हणजे, नवल टाटा यांनी विश्वस्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात हे घडलं.
२. किंमत शून्य: टाटा सन्सच्या शेअर रजिस्टरमध्ये या हस्तांतरणाची किंमत 'शून्य' नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच, या शेअर्ससाठी कोणताही मोबदला देण्यात आला नाही.
३. तांत्रिक त्रुटी: कंपनी कायदा १९५६ च्या नियमांचे आणि आवश्यक 'ट्रान्सफर डीड'चे पालन करण्यात आलेलं नाही. तसंच, या व्यवहाराला मंजुरी देणारा कोणताही अधिकृत ठराव रेकॉर्डवर उपलब्ध नाही.
४. हितसंबंधांचा संघर्ष: नवल टाटा हे त्यावेळी ट्रस्टशी संबंधित होते आणि रतन टाटांचे वडील होते, त्यामुळे याला 'रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन' म्हटलं गेलं आहे. ट्रस्टची संपत्ती वैयक्तिक फायद्यासाठी वापरणं हे विश्वस्तांच्या कर्तव्याचं उल्लंघन असल्याचं नोटीसमध्ये नमूद केलं आहे.
कोणाकोणाला पाठवली नोटीस?
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन, विजय सिंग, जिमी टाटा, जहांगीर जहांगीर, डॅरिअस खंबाटा, सिद्धार्थ शर्मा, नेविल टाटा आणि भास्कर भट यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
