हरीश राणाचा मृत्यूकडे प्रवास सुरु! आजपासून पाणी देणे बंद केले, कुटुंबीयांसाठी क्षण भावूक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 08:17 IST2026-03-17T08:15:25+5:302026-03-17T08:17:20+5:30
AIIMS Harish Rana Case Update: एम्समध्ये हरीश राणा यांना मृत्यूकडे नेणारी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टरांची टीम प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. वाचा सविस्तर.

हरीश राणाचा मृत्यूकडे प्रवास सुरु! आजपासून पाणी देणे बंद केले, कुटुंबीयांसाठी क्षण भावूक...
दिल्लीतीलएम्स रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि अंतिम टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली हरीश यांची जीवन रक्षक उपकरणे टप्प्याटप्प्याने हटवण्याची प्रक्रिया पुढे नेली जात आहे. तसेच आजपासून हरीश राणाचे पाणी बंद करण्यात येत आहे.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने एक अत्यंत कठीण आणि कायद्याच्या चौकटीतील निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांना आजपासून पाणी देणे देखील बंद करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 'पॅसिव्ह युथनेशिया' (निष्क्रिय इच्छामृत्यू) संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हरीश राणा हे गेल्या अनेक वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आणि कोमात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे डॉक्टरांनी वारंवार स्पष्ट केले आहे. हरीश यांच्या पालकांनी आपल्या मुलाची वेदना सहन न झाल्याने कोर्टाकडे 'इच्छामृत्यू'ची मागणी केली होती.
अन्न आणि पाणी बंद
एम्स प्रशासनाने आधीच त्यांचे अन्न बंद केले होते. आजपासून त्यांना देण्यात येणारे पाणीही थांबवण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या शरीराचे कार्य हळूहळू थांबून नैसर्गिक मृत्यू ओढवेल.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमची चोवीस तास देखरेख
एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मॉनिटरच्या माध्यमातून हरीश राणा यांच्या हृदयाची प्रत्येक धडधड आणि नब्जवर बारीक लक्ष ठेवून आहे. सुमारे ५ ते ९ सदस्यांची एक विशेष टीम ही संपूर्ण प्रक्रिया राबवत आहे. ही टीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि 'पॅसिव्ह युथनेशिया'च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. या संवेदनशील प्रकरणाबाबत एम्स प्रशासनाने अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला असून, अद्याप कोणतेही औपचारिक निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
काय आहे 'पॅसिव्ह युथनेशिया'?
जेव्हा एखादा रुग्ण अशा स्थितीत असतो जिथून तो पुन्हा बरा होऊ शकत नाही, तेव्हा त्याचे जीवन वाचवणारी औषधे, अन्न किंवा पाणी बंद करणे म्हणजे 'पॅसिव्ह युथनेशिया'. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये एका ऐतिहासिक निकालात याला कायदेशीर मान्यता दिली होती.
विज्ञान, कायदा आणि संवेदनांचा संगम
एम्सच्या शांत कॉरिडॉरमध्ये सध्या एक अतिशय भावनिक आणि कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहे. जिथे वैद्यकीय विज्ञान, भारताचा कायदा आणि मानवी संवेदना या तिन्हींचा कस लागत आहे. हरीश यांचे अन्न आणि पाणी बंद केल्यानंतर, आता त्यांच्या शरीराची साथ मिळेपर्यंत डॉक्टरांची टीम त्यांचे निरीक्षण करत राहील.