मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:30 IST2026-05-12T18:29:00+5:302026-05-12T18:30:42+5:30
NCP SP Group Jayant Patil News: जयंत पाटील म्हणाले की, मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच. पण...

मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
NCP SP Group Jayant Patil News: आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. पण २०-३० गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय?, अशी विचारणा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. पश्चिम आशियात युद्धाचे ढग गडद झाले असल्याने त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा आणि इंधन बचत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावरून विरोधक टीका करत आहेत. यातच जयंत पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट करत टोला लगावला आहे.
जयंत पाटील एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या... वाजवल्या. दिवे लावायला सांगितले तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण २०-३० गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण…
मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस हे प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच… पण सत्ताधाऱ्यांनीही "राष्ट्र प्रथम" हे धोरण कृतीत उतरवावे, ही अपेक्षा…, असे जयंत पाटील यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, देशात इंधनाचा तुटवडा असल्याच्या अफवा आणि किमती वाढण्यासंदर्भातील चर्चेदरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी १२ मे रोजी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना देशात इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचे आश्वस्त केले आहे.
देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या... वाजवल्या. दिवे लावायला सांगितले तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 12, 2026
मध्यमवर्गासाठी काटकसर…