Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:49 IST2026-04-16T18:42:34+5:302026-04-16T18:49:53+5:30

तुम्हाला माहिती आहे का की, भारताचं सर्वात पहिलं हिल स्टेशन नेमकं कोणतं आहे? जर तुम्हाला वाटत असेल की शिमला किंवा मनाली हे पहिलं हिल स्टेशन आहे, तर तुम्ही चुकताय.

उन्हाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपसूकच थंड हवेच्या ठिकाणांकडे वळतात. भारतात पर्यटनासाठी अनेक हिल स्टेशन्स आहेत. कुणी सिमल्याला पसंती देतं, तर कुणी मनाली किंवा नैनितालला.

पण तुम्हाला माहिती आहे का की, भारताचं सर्वात पहिलं हिल स्टेशन नेमकं कोणतं आहे? जर तुम्हाला वाटत असेल की शिमला किंवा मनाली हे पहिलं हिल स्टेशन आहे, तर तुम्ही चुकताय. भारताचं सर्वात पहिलं अधिकृत हिल स्टेशन होण्याचा मान 'मसूरी'कडे जातो.

'क्वीन ऑफ हिल्स' म्हणजेच 'डोंगरांची राणी' म्हणून ओळखले जाणारे मसूरी हे उत्तराखंडमधील एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणाला हिल स्टेशनचा दर्जा मिळण्यामागे एक रंजक इतिहास आहे. उंच डोंगर, हिरव्यागार दऱ्या आणि अंगाला स्पर्श करणारी थंड हवा पर्यटकांना भुरळ घालते. समुद्रसपाटीपासून ६७५८ फूट उंचीवर वसलेल्या मसूरीमध्ये आजही इंग्रजकालीन खुणा पाहायला मिळतात.

भारतात हिल स्टेशनची संकल्पना इंग्रजांनी आणली. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा भारतात कडक उन्हाळा असायचा, तेव्हा ब्रिटिशांना तो सहन व्हायचा नाही. उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी इंग्रज अधिकारी आपल्या कुटुंबासह मसूरीच्या डोंगराळ भागात येऊन राहू लागले.

विशेष म्हणजे, आज जिथे मोठे रिसॉर्ट्स आहेत, तिथे सुरुवातीला इंग्रजांनी राहण्यासाठी छोट्या झोपड्या बांधल्या होत्या. हळूहळू या झोपड्यांचे रूपांतर अलिशान बंगल्यात आणि रिसॉर्ट्समध्ये झाले. त्यानंतर तिथे बाजारपेठा, चर्चेस, शाळा आणि रस्ते विकसित झाले.

असे म्हटले जाते की, मसूरीमध्ये सफरचंदाचे पहिले झाड इंग्रजांनीच लावले होते. मसूरीची स्थापना १८२३ मध्ये झाली होती, म्हणजेच या ठिकाणाला आता २०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही येथे देवदारच्या झाडांची मोठी वनराई पाहायला मिळते, जी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

मसूरीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पोहोचणे अत्यंत सोपे आहे. डेहराडूनपासून जवळ असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. विशेष म्हणजे, इतर हिल स्टेशन्सच्या तुलनेत मसूरीमध्ये तुम्ही कमी खर्चातही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. त्यामुळेच आजही मसूरी हे मध्यमवर्गीयांच्या आणि नवविवाहित जोडप्यांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे.