'ही' काळजी घ्या नाहीतर सिस्टीम 'हॅक' करून लाखोंची कार होईल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 20:15 IST2026-02-26T20:01:05+5:302026-02-26T20:15:58+5:30

तंत्रज्ञान जितके प्रगत होत आहे, तितकेच ते धोक्याचेही ठरू लागले आहे. पूर्वी कारची काच फोडून किंवा बनावट चावीने कार चोरीला जात असत. मात्र, आताच्या स्मार्ट कारमध्ये साध्या चाव्यांची जागा 'की-लेस' एन्ट्री आणि रिमोट स्टार्टअप सिस्टीमने घेतली आहे. दुर्दैवाने, हायटेक चोरट्यांनी या सिस्टीमलाच आहे. खिंडार पाडले. सध्या मोठमोठ्या शहरांत लॅपटॉप आणि टॅबच्या सहाय्याने कारची सिस्टीम हॅक करून काही मिनिटांत महागड्या गाड्या लंपास करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. चंद्रपुरात असे प्रकार नसले तरीही अंगणातील किंवा इतर ठिकाणच्या दुचाकी चोरीला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

कार हॅक कशी केली जाते? - जेव्हा तुम्ही चावी जवळ घेऊन कारकडे जाता, तेव्हा कार आणि चावी यांच्यात रेडिओ फ्रिक्वेन्सीचा संवाद होतो. चोरटे 'रिले अटॅक' नावाच्या तंत्राचा वापर करतात. एक चोरटा तुमच्या घराच्या दरवाजापाशी उभा राहून चावीचे सिग्नल स्कॅन करतो आणि दुसरा चोरटा कारजवळ उभा राहून ते सिग्नल रिसिव्ह करतो. कारला वाटते की मालक जवळच आहे आणि लॉक उघडले जाते. एकदा आत शिरल्यावर ओबीडी पोर्टद्वारे कारचे इंजिन सुरू केले जाते.

कार पार्क करताना काय काळजी घ्याल? - चावी सुरक्षित ठेवावी. घराच्या दरवाजाजवळ किंवा खिडकीपाशी कारची वा वाहनाची चावी ठेवू नका. एका विशिष्ट पाऊचमध्ये ठेवा, जे रेडिओ सिग्नल ब्लॉक करते. डिजिटल सुरक्षेसोबतच जुन्या पद्धतीचे 'फिजिकल स्टिअरिंग लॉक' किंवा 'व्हील लॉक' वापरा. ते तोडण्यात चोरांचा वेळ जातो. आपल्या कारचे सॉफ्टवेअर कंपनीकडून वेळोवेळी अपडेट करून घ्या.

महागडी कार वा दुचाकी दारात आहे? झोपेत राहू नका - तुमची कार किंवा दुचाकी सुरक्षित पार्किंगमध्ये किंवा घराच्या अगदी दारात उभी असली तरी ती सुरक्षित आहेच, असे समजू नका. चोरटे रात्रीच्या वेळी किंवा वर्दळीच्या ठिकाणी अशा कारना टार्गेट करतात ज्यामध्ये 'पुश बटण स्टार्ट' सारखे फिचर आहे. तर दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी घेऊन पसार होतात. तुमची गाफील राहण्याची वृत्ती चोरांच्या पथ्थ्यावर पडू शकते.

टॅब, ओबीडी डिव्हाइस आणि रिले बॉक्सचा वापर - कार चोरण्यासाठी आता हातोड्याची गरज उरलेली नाही. चोरटे प्रामुख्याने ओबीडी डिव्हाइस, रिले बॉक्स, टॅब किंवा लॅपटॉपचा वापर करतात. तर दुचाकी चोरण्यासाठी सुद्धा हातोडा न वापरता कटरसारख्या साहित्याचा वापर केला जातो.

टेक्नो सॅव्ही चोरांच्या टोळ्या; १५ मिनिटांत चोरली जाते कार - या टोळ्या अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करतात. एका कारची रेकी करण्यासाठी आणि तिचे लॉक तोडून ती सुरू करण्यासाठी त्यांना केवळ १० ते १५ मिनिटांचा अवधी लागतो. अलार्म वाजू न देता सिस्टीममध्ये प्रवेश मिळवण्यात ते माहीर असतात.