PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 19:45 IST2026-05-17T19:30:00+5:302026-05-17T19:45:35+5:30
यामुळे देशातील परकीय चलन वाचवण्यास मोठी मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे...

सोन्याची खरेदी टाळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा प्रभाव आता देशभरात दिसू लागला आहे. 'लोकलसर्कल्स' (LocalCircles) च्या एका नव्य सर्वेक्षणानुसरा, तब्बल ६१ टक्के सोने खरेदीदारांनी पुढील एक वर्षापर्यंत सोन्याची खरेदी टाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील परकीय चलन वाचवण्यास मोठी मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

खरेतर, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारताची सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. यामुळे परकीय चलन साठ्यावर मोठा ताण पडला. याशिवया, अमेरिका-इस्रायलमधील तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

६६% लोकांचा पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा - गेल्या आठवड्यात हैदराबादमधील एका सभेत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना वर्षभर अनावश्यक सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात, सोने खरेदी न केल्यास देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित राहील, असे ६६ टक्के लोकांचे मत आहे.

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारताने तब्बल ७१.९८ अब्ज डॉलर्सचे सोने आयात केले. जे आर्थिक वर्ष २०२५ च्या तुलनेत तबबल २४ टक्के अधिक आहे. २०२५ मध्ये ५८ अब्ज डॉलर्सचे सोने आयात करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, आयात केलेल्या सोन्याच्या वजनाचा विचार करता, ते ७५७.०९ टनवरून घसरून ७२१.०३ टनवर आले आहे. अर्थात, जागतिक बाजारात प्रति किलो सोन्याची किंमत ७६,६१७ डॉलर्सवरून थेट ९९,८२५ डॉलर्सवर पोहोचल्याने भारताचे आयात बिल प्रचंड वाढले आहे.

काय सांगते आकडेवारी? - सर्व्हेनुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सोने आणि चांदीची एकूण आयात २६.७ टक्क्यांनी वाढून १०२.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. देशाच्या एकूण आयातीत यांचे प्रमाण १४ टक्क्यांवर पोहोचले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८४ हजार लोकांपैकी २८ टक्के लोकांनी म्हटले आहे की, आपण सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर कमी करू. तर ३६ टक्के लोकांनी वर्षभर सोने न खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय १९ टक्के लोक म्हणाले की, आपण केवळ लग्नकार्य आणि पारंपारिक गोष्टींसाठीच सोने खरेदी करू. तर उर्वरित १९ टक्के लोकांनी, सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जात असल्याने, आपली खरेदी सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
















