शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 19:26 IST2026-05-17T19:02:34+5:302026-05-17T19:26:21+5:30

धुळ्याच्या साक्री तालुक्यात शनि अमावस्येला दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे.

Double murder on Shani Amavasya Tantrik kills two for occult practices gets caught due to a handkerchief | शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला

शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला

Dhule Crime: धुळ्याच्या शिरपूर येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, साक्री तालुक्यातून आणखी एका धक्कादायक दुहेरी हत्याकांडाचा प्रकार समोर आला आहे. शनि अमावस्येच्या पार्श्वभूमीवर, अघोरी पूजा अन् भोंदूगिरीच्या नादी लागल्याने एका २५ वर्षीय विवाहितेसह २८ वर्षांच्या तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासचक्र फिरवत स्वतःला महाराज म्हणवून घेणाऱ्या एका भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या आहेत. एका हत्येचा तपास करताना जमिनीखाली गाडलेला दुसरा मृतदेह बाहेर आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

जयश्री रजनीकांत काकुस्ते आणि अक्षय सोनवणे अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी संशयित भोंदू योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार याला अटक केली आहे.

रस्त्यावरील मृतदेहाने वेधले लक्ष

या भयानक घटनेची सुरुवात शनिवारी सकाळी झाली. भडगाव टेंभे फाट्याजवळ एका महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर तिचीच स्कूटी टाकून अपघाताचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, महिलेचे तोंड रुमालाने घट्ट बांधलेले असल्याने हा घातपात असल्याचे पोलिसांच्या तात्काळ लक्षात आले. पोलिसांनी ओळख पटवली असता, ती जयश्री काकुस्ते असल्याचे समोर आले. जयश्री ही बचत गटांचे कलेक्शन करण्याचे काम करायची. तिच्या मृतदेहाजवळ तिची पर्स आणि मोबाईल सुरक्षित असल्याने हा प्रकार लुटीचा नसून वैयक्तिक वादातून किंवा अन्य कारणाने झाल्याचा पोलिसांना संशय आला.

संशयावरून पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत जैताणे येथील योगेश खैरनार याला ताब्यात घेतले. योगेश हा उभरांडी रस्त्यावरील एका मठात राहायचा आणि गुढ्या बघून भविष्य सांगायचा. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जयश्रीचा खून एका तरुणाने केला, मी तिला वाचवायला गेलो असता माझ्या हातून त्या तरुणाचा जीव गेला आणि मी त्याचा मृतदेह मठाजवळील टेकडीवर पुरला, अशी बनावट कथा त्याने रचली.

पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याचा सगळा खोटेपणा उघडा पडला. मठात झालेल्या वादातून योगेशनेच आधी अक्षय सोनवणे या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या केली होती आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह टेकडीवर खड्डा खणून पुरून टाकला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अक्षयचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला.

स्कूटीवर नेऊन केली हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार शनि अमावस्या असल्याने जयश्री आणि अक्षय हे दोघेही भोंदू योगेश खैरनार याच्या मठात आपली काही अडलेली कामे घेऊन किंवा हवनासाठी गेले होते. तेथे नेमका काय वाद झाला, याचा तपास सुरू आहे. मात्र, मठात अक्षयची हत्या केल्यानंतर योगेशने जयश्रीला संशय येऊ नये म्हणून तिच्याच दुचाकीवर बसवून नेले आणि वाटेत तिचीही गळा आवळून हत्या केली.

रुमालामुळे संशय पक्का

हत्येनंतर दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या दिशेला टाकून त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जयश्रीच्या तोंडाला बांधलेला रुमाल हा योगेशचाच असल्याचे निष्पन्न झाले. तसेच घटनास्थळावर मिळालेल्या गाडीच्या खुणा, मोबाईल लोकेशन आणि श्वान पथकाने दाखवलेली दिशा यांमुळे पोलिसांचा संशय पक्का झाला.

Web Title : शनि अमावस्या पर दोहरी हत्या: धुले में ढोंगी गुरु गिरफ्तार

Web Summary : धुले में दोहरे हत्याकांड का खुलासा, ढोंगी गुरु के काले कारनामे सामने आए। शनि अमावस्या के पास एक महिला और एक युवक की निर्मम हत्या कर दी गई। पुलिस ने तुरंत संदिग्ध को गिरफ्तार कर, उसकी झूठी कहानी का पर्दाफाश किया और एक दफन शव बरामद किया।

Web Title : Double Murder on Saturn's Day: Fake Guru Arrested in Dhule

Web Summary : A shocking double murder in Dhule reveals a fake guru's dark deeds. A woman and a young man were brutally killed near Shani Amavasya. Police swiftly arrested the suspect, exposing his fabricated story and uncovering a buried body.