कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 18:23 IST2026-05-17T18:23:33+5:302026-05-17T18:23:44+5:30
अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला.

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
पुणे - कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील बेल्हाजवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. भिवंडी डेपोची शेवगाव-कल्याण-भिवंडी मार्गावरील एसटी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन खोल खड्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की बस पलटी होऊन तिची चाके वर झाली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून २० ते २५ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. बेल्हा येथील गुंजाळवाडी फाटा परिसरात दुपारी पाचच्या सुमारास हा थरारक अपघात घडला.
अधिकच्या माहितीनुसार, धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गाखालील खोल खड्यात जाऊन पडली. रविवारी सुट्टी असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक केबिनमध्ये अडकला होता. परिस्थिती गंभीर असल्याने घटनास्थळी जेसीबी आणि क्रेन मागवण्यात आली. तब्बल काही वेळ चाललेल्या बचावकार्यानंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
जखमी चालकासह इतर प्रवाशांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसचा क्रमांक MH14BT4023 असून ती भिवंडी डेपोची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.