Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:49 IST2026-05-16T18:46:05+5:302026-05-16T18:49:23+5:30
Monsoon in Andaman : शेतकऱ्यांसाठी आणि कडाक्याच्या उन्हात होरपळणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
शेतकऱ्यांसाठी आणि कडाक्याच्या उन्हात होरपळणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून आपल्या ठराविक वेळेच्या आधीच देशात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, आज १६ मे २०२६ रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची पुढील वाटचाल अत्यंत वेगाने आणि अनुकूल गतीने सुरू असून, येत्या २६ मे रोजी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून आज १६ मे रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, संपूर्ण निकोबार बेट आणि 'श्री विजयपूरम'सह अंदमान बेटांच्या काही भागात अधिकृतपणे दाखल झाला आहे.
🌧️ Southwest Monsoon Update 2026 🌧️
— India Meteorological Department (@Indiametdept) May 16, 2026
The Southwest Monsoon has officially advanced into parts of the southeast Arabian Sea, southwest & southeast Bay of Bengal, many parts of the Andaman Sea, entire Nicobar Islands and parts of the Andaman Islands including Sri Vijaya Puram on 16… pic.twitter.com/zZI7ZEW5G1
देशात साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश होतो. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकत संपूर्ण देश व्यापतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत असणाऱ्या पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात मान्सूनच्या केरळ प्रवेशापासून होते. मात्र यंदा अंदमानात असलेली गती पाहता मान्सून सरासरी वेळेच्या जवळपास ६ दिवस आधी म्हणजेच २६ मे २०२६ रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश २४ मे रोजी झाला होता. यंदाही मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने कृषी क्षेत्रासह विविध घटकांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. भारतीय हवामान विभागाने संभाव्य तारीख २६ मे सांगितली असली तरी मान्सूनचा प्रवेश चार दिवस आधी किंवा चार दिवस उशिराही होऊ शकतो.
