Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:17 IST2026-05-16T17:14:48+5:302026-05-16T17:17:52+5:30

Adhik Maas 2026 Shree Swami Samarth Charitra Saramrut: अधिक मासात वेळ काढून आवर्जून स्वामींची सेवा करावी, असे म्हटले जात आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणाचे नियम, योग्य पद्धत सविस्तर जाणून घ्या...

adhik maas 2026 recitation of shri swami samarth charitra saramrut swami seva will bring timeless blessings know important rules and right method | Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!

Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!

Adhik Maas 2026 Shree Swami Samarth Charitra Saramrut: रविवार, १७ मे २०२६ पासून अधिक मास सुरू होत आहे. मराठी वर्षातील अतिशय शुभ कालावधी. यंदा २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असणार आहे. या अधिक महिन्यात कुलदेवता, इष्टदेवता, श्रीविष्णू तसेच सद्गुरूंची विशेष उपासना, सेवा, नामस्मरण, पूजन, व्रत करावे, असे म्हटले जाते. या उपासनेचे अनेक पट पुण्य मिळते असे म्हटले जाते. या अधिक मासात गुरुचरित्र, श्री गजानन विजय, श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे पारायण करणे शुभ मानले गेले आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायचे असेल, तर काय करावे, स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे? सविस्तर जाणून घेऊया...

रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. सोमवार, १५ जून २०२६ याच दिवशी निज ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी निज ज्येष्ठ मास संपणार आहे. मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत अधिक मास पाळला जातो. यातील ज्येष्ठ अधिक मास काळात स्वामींची जमेल तेवढी सेवा करावी, असे म्हटले जाते. शक्य असेल तर दररोज तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायचे असेल, तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात, असे सांगितले जाते. 

संकल्प बद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी

स्वामींच्या सेवेसाठी वेळ पाहण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले जाते. असे असले तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची ३, ७, ११ आणि २१ अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. यंदा २०२६ रोजी अधिक मासात अतिशय शुभ पुण्यकारक गुरुपुष्यामृत जुळून येत आहे. गुरुवार, २१ मे २०२६ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवसापासून पारायण करायला सुरुवात करू शकाल. 

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण संकल्प कसा करावा?

सकाळी नित्याची देवपूजा करून श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करण्यास बसावे. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत, हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे.

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण पद्धत, वेळ

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामी महाराजांचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा. एका चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. सकाळी एक वेळ निश्चित करावी. शक्यतो ही वेळ चुकवू नये. पारायण करताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. पोथीला मनापासून नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण भोजनापूर्वी करावे. 

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना काय करावे?

पारायण करताना श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत, असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावे.

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना काय काळजी घ्यावी?

श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता.

अधिक मासात पारायण केल्याने नेमका काय लाभ होतो?

श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते. पुण्य संचय वाढतो. स्वामी सेवेचे समाधान प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. 

- श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला, तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते. वेगळीच ऊर्जा संचारते. प्रेरणा मिळते. 

- श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. 

- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. 

- स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. स्वामी म्हणतात की, जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात.

- स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. 

- स्वामी महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामी सेवा करत राहा. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

Web Title : अधिक मास 2026: स्वामी सेवा से कालातीत कृपा प्राप्त करें!

Web Summary : 17 मई 2026 से अधिक मास शुभ है। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत का पाठ कर आशीर्वाद प्राप्त करें। भक्ति से अनुष्ठान करें, इच्छा पूर्ति की कामना करें। 21 मई को गुरु पुष्यामृत योग पर परायण शुरू करना उत्तम है।

Web Title : Adhik Maas 2026: Seek timeless grace with Swami Seva!

Web Summary : Adhik Maas 2026 from May 17th is auspicious. Recite Shree Swami Samarth Charitra Saramrut for blessings. Follow rituals with devotion, seeking wish fulfillment. Guru Pushyamrut on May 21st is ideal to start parayan.