अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:10 IST2026-05-16T17:08:52+5:302026-05-16T17:10:09+5:30
लग्नानंतर अवघ्या १६ दिवसांनी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील ७२ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरी गायब झाली.

अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
लग्नानंतर अवघ्या १६ दिवसांनी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील ७२ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन नवरी गायब झाली. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये ही घटना घडली. लोमा गावातील रहिवासी असलेल्या धर्मेंद्रचं लग्न २५ एप्रिल रोजी पियर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीशी झालं होतं. लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण १६ व्या दिवशी जेव्हा संपूर्ण कुटुंब झोपलं होतं, तेव्हाच नवरी घरात ठेवलेले ७२ हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झाली.
सकाळी जेव्हा धर्मेंद्रला जाग आली तेव्हा त्याची पत्नी बेडवर नव्हती. सुरुवातीला त्याला वाटलं की ती घराच्याच कुठल्यातरी भागात असेल. पण शोध सुरू झाला तेव्हा प्रकरण काही वेगळंच निघालं. कुटुंबीयांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे चौकशी केली, पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. जेव्हा घरातील पेट्या आणि कपाटांची तपासणी केली, तेव्हा रोख रक्कम आणि दागिने गायब असल्याचं आढळून आलं.
नवरदेवाच्या कुटुंबाने केला आरोप
नवरी एकटी पळून गेली नसून सर्व काही प्लॅनिंग असल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. लग्न हे केवळ एक निमित्त होतं आणि घरातील ऐवज घेऊन पळून जाणं हाच मुख्य हेतू होता, असा आरोप नवरदेवाच्या कुटुंबाने केला आहे. धर्मेंद्रने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पत्नी अचानक घरातून गायब झाल्याचं म्हटलं आहे.
नवरीच्या कुटुंबाचा पलटवार
नवरीच्या कुटुंबीयांनी यावर पलटवार केला आहे. त्यांची मुलगी स्वतःच्या इच्छेने गेलेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. उलट सासरच्या लोकांनीच तिला गायब केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. म्हणजेच, एकीकडे नवरा म्हणतोय की नवरी दागिने घेऊन पळून गेली, तर दुसरीकडे मुलीचे कुटुंबीय म्हणतायत की आमच्या मुलीला गायब करण्यात आलं आहे.
पोलीस तपास सुरू
गायघाटचे पोलीस ठाणे प्रभारी राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी जोडलेलं असल्याचं वाटत आहे. सध्या पोलीस नवरीचा शोध घेत असून संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.