NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:03 IST2026-05-16T17:03:37+5:302026-05-16T17:03:54+5:30
NEET Exam Paper Leak नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ती तज्ज्ञ म्हणून सहभागी होती, तिने पुण्यातील मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचे तपासात समोर आले आहे

NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
पुणे : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी एका मुख्य सूत्रधाराचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील वनस्पतीशास्त्राची वरिष्ठ शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ती तज्ज्ञ म्हणून सहभागी होती. तिने पुण्यातील मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या वर्गांमध्ये शिकवण्यात आलेले अनेक प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लर चालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एप्रिल २०२६ मध्ये तिच्या घरी बोलवले होते. तेथे प्रा. मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती तिने दिली होती. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर प्रा. मांढरेला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली.
सीबीआयने केलेल्या चौकशीनुसार, राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (एनटीए) मांढरे हिची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तिला वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांची माहिती होती. यातील बहुतांश प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात यापूर्वी मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील धनंजय लोखंडे यांना अटक करण्यात आली होती. लोखंडेच्या संपर्कातून पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने तपासाची सूत्रे वेगाने हलवली होती. ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला देखील नुकतीच अटक करण्यात आली. पुण्यातील अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरातील सहा ठिकाणी शोधमोहीम राबवून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू असल्याचे सीबीआयने सांगितले.
आतापर्यंत ९ जणांना अटक
या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, सखोल चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना पुणे न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली असून, त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी दिल्लीला हलवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा वाघमारे हीचा पती डेंटिस्ट आहे. तिच्या पतीचे बिबवेवाडीत रुग्णालय आहे. वाघमारेच्या डाॅक्टर पतीची या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.