NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:44 IST2026-05-16T17:43:55+5:302026-05-16T17:44:50+5:30
NHAI Recruitment 2026: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६ या वर्षासाठी रिक्त पदांची घोषणा केली.

NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६ या वर्षासाठी रिक्त पदांची घोषणा केली. एनएचएआयकडून उपव्यवस्थापक (टेक्नोलॉजी) या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले. सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी सरकारीनोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.
या भरतीअंतर्गत एकूण ६० पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार येत्या १५ जून २०२६ सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एनएचएआयच्या अधिकृत वेबसाईटवरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पात्रता काय?
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांकडे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील 'ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग' परीक्षेत उत्तीर्ण असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार स्तर १० चे (५६ हजार १०० ते १ लाख ७७ हजार ५०० रुपयांपर्यंत) वेतन मिळेल. याशिवाय, नियमानुसार केंद्रीय महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील देय असतील.