“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:53 IST2026-05-16T18:52:50+5:302026-05-16T18:53:39+5:30
PM Modi Netherlands Tour: आताच्या जागतिक परिस्थितीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी येणाऱ्या संकटाची जाणीव करून देणारे विधान केल्याचे म्हटले जात आहे.

“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
PM Modi Netherlands Tour: आजच्या घडीला मानवतेसमोर अनेक आव्हाने उभी ठाकलेली आहेत. आजच्या पिढ्या नवीन आव्हानांचा सामना करत आहे. आधी कोरोना आला, मग युद्धांना सुरुवात झाली आणि आता ऊर्जेचे संकट आले आहे. हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक ठरत आहे. ही परिस्थिती वेगाने बदलली नाही, तर गेल्या अनेक दशकांच्या यशावर, मेहनतीवर पाणी फिरेल, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक विधान करत संकटाच्या तीव्रतेची जाणीव करून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. नेदरलँड्समधील हेग हे शहर जगभरात 'शांतीचे शहर' म्हणून ओळखले जाते. येथील भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वाचे विचार मांडले. आजच्या संकटांमुळे आणि परिस्थिती सुधारली नाही, तर जगातील मोठी संख्या पुन्हा एकदा गरिबीच्या दरीत लोटली जाऊ शकेल. अशा परिस्थितीत नेदरलँड्स आणि भारत एक विश्वासू, पारदर्शक आणि भविष्याचा विचार करून पुरवठा साखळी तयार करण्याच्या दिशेने पुढे जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारतीय संस्कृती लोकांच्या हृदयात खोलवर रुजलेली आहे
पंतप्रधान म्हणाले की, आजचा भारत मोठी स्वप्ने पाहत आहे. भारताने चंद्रावर पोहोचून इतिहास रचला आहे, जिथे जगातील इतर कोणताही देश यापूर्वी पोहोचला नव्हता. जेव्हा नेदरलँड्सच्या नेतृत्वाशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी नेहमीच भारतीय समुदायाची प्रशंसा केली. काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत, पण भारतीय संस्कृती लोकांच्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. काळ बदलला, पण मूल्ये आणि जिव्हाळा कायम आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
दरम्यान, भारत सेमीकंडक्टर क्षेत्रात वेगाने लक्षणीय प्रगती करत आहे. देशात सध्या १२ सेमीकंडक्टर प्रकल्प उभारले जात असून, त्यापैकी दोन प्रकल्पांमध्ये उत्पादन आधीच सुरू झाले आहे. हा देश जगातील सर्वांत मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना चालवतो. भारताने UPI व्यवहारांच्या क्षेत्रात लक्षणीय यश मिळवले आहे. आज भारतात दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे नेदरलँड्स जगभर ट्यूलिप फुलांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे भारत कमळांसाठी ओळखला जातो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Delighted to interact with the Indian community in The Hague. Their warmth, achievements and strong bond with India continue to make us proud. https://t.co/DVKQo1pKXw
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2026