मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:52 IST2026-05-16T14:50:33+5:302026-05-16T14:52:09+5:30
BMC Water Supply News: पाणी कपातीच्या काळासाठी मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन, मुंबईकरांना त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न

मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
मुंबई : मुंबई पालिकेकडून १० टक्के पाणी कपात लागू झाल्याने या काळात मुंबईकरांना ठरलेल्या वेळेत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. या काळात जलवाहिन्यांवर किंवा नळजोडणीवर अनधिकृतरीत्या विद्युत मोटर पंप किंवा बुस्टर लावून पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना बांगर यांनी दिल्या आहेत.
मुंबई शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा २१ टक्क्यांवर आला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने पाणीकपात लागू केली आहे. मात्र, या काळात सुरळीत पाणीपुरवठा होऊन कपातीची झळ कमी प्रमाणात बसेल, याची खबरदारी घेण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या आहेत. त्यांनी बैठक घेऊन दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांच्याशी संवाद साधला.
टेकडी, उंच भागांत पाणी पुरवठ्यावर परिणाम
पाणीकपातीची कारणमीमांसा, त्याचा पाणीपुरवठा व्यवस्थेवर होणारा परिणाम, संभाव्य अडचणी, तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. मुंबईतील लागू करण्यात आलेल्या १० टक्के पाणी कपातीमुळे मुंबईतील टेकडीवरील उंच भाग, टोकाचा भाग, पाणीपुरवठ्याचा वेळ कमी असणारा भाग अशा ठिकाणी पाणीपुरवठ्यात अडचणी उद्भवू शकतात.
महापालिका अधिकाऱ्यांनी नियोजन करावे
प्रत्येक विभागातील दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांना परिसराची रचना, पाणी वितरण व्यवस्थेची अचूक माहिती असते. त्या आधारावर कोणत्या भागांत परिसरांमध्ये पाण्याच्या अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे, याचा स्वत: आढावा घेऊन ॲक्शन प्लॅन बनवून उपाय राबवावेत, असे निर्देश बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुढील आठवड्यात प्रभागनिहाय नियोजन व अडचणींची सविस्तर माहिती सादर करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
मुंबईमध्ये पाण्याची चोरी वाढली
पालिकेने २०२२ पासून ‘सर्वांसाठी पाणी’ या धोरणांतर्गत आतापर्यंत सुमारे २० ते २२ हजार अधिकृत नळजोडण्या दिल्या आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर १५ दिवसांत जोडणी दिली जाते. मात्र, मुंबई शहरात पाणीचोरीच्या घटना घडत असल्याने पाणीकपातीच्या काळात बेकायदा नळजोडण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची भीती आहे.
महापालिका पंप जप्त करणार
पाणी कपातीमुळे जलवाहिन्यांवर किंवा नळ जोडणीवर अनधिकृतरीत्या विद्युत मोटर बसवून पाण्याचा उपसा करणे, हा दंडनीय अपराध आहे. अशा प्रकारांमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होतो, तसेच काही ठिकाणी दूषित पाणी मिसळण्याचा धोकाही वाढतो.
याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी आणि या प्रकारांपासून नागरिकांना परावृत्त करण्याचे निर्देश बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले. अनधिकृत विद्युत पंप आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून ती जप्त करण्यात येईल आणि वारंवार नियमभंग करणाऱ्यांचा नळ जोडणीद्वारे होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पाणी कपातीच्या काळात सर्व नागरिकांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.