उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:40 IST2026-05-16T14:39:41+5:302026-05-16T14:40:23+5:30
बिहारच्या गोपाळगंजमधील एका तरुणाला दुबईत उडत्या विमानाचा फोटो काढणे चांगलेच महागात पडले आहे.

AI Generated Image
परदेशात नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न घेऊन गेलेल्या एका भारतीय तरुणाला एका छोट्याशा चुकीमुळे आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला आहे. दुबईत उडत्या विमानाचा फोटो काढणे आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करणे या तरुणाला इतके महागात पडले की, दुबईच्या न्यायालयाने त्याला थेट १० वर्षांच्या तुरुंगवासाची कडक शिक्षा सुनावली आहे. या धक्कादायक बातमीमुळे बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी खळबळ उडाल्या असून, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वसीम अकरम असे शिक्षा झालेल्या २३ वर्षीय दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो गोपाळगंजच्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रफी इंदरवा गावचा रहिवासी आहे.
२२ महिन्यांपूर्वी रोजगारासाठी गेला होता दुबईला
मिळालेल्या माहितीनुसार, वसीम अकरम हा सुमारे २२ महिन्यांपूर्वी घरची परिस्थिती बेताची असल्याने रोजगाराच्या शोधात दुबईला गेला होता. तिथून मिळणाऱ्या पैशांमधून तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता. सर्व काही ठीक सुरू असतानाच एका अनावधानाने घडलेल्या घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले.
आंतरराष्ट्रीय तणावादरम्यान काढला विमानाचा फोटो
सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तीव्र आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, दुबईमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत वसीमने अनवधानाने आपल्या मोबाईल फोनमधून दुबईच्या आकाशात उडणाऱ्या एका विमानाचा फोटो काढला. इतकेच करून तो थांबला नाही, तर त्याने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केला. दुबई सरकारने या गोष्टीला अत्यंत गंभीरतेने घेतले.
नमाज पठणासाठी बाहेर पडला अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एक दिवस वसीम जेव्हा नेहमीप्रमाणे नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडला, तेव्हा दुबईच्या रसल खेमा रम्स पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला घेराव घालून अटक केली. दुबईच्या न्यायालयाने हे प्रकरण देशसुरक्षेशी जोडलेले आणि अत्यंत संवेदनशील मानले. लष्करी हालचाली किंवा विमानांचे अनधिकृत फोटो काढण्याच्या कडक कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने वसीमला थेट १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
भारतात कुटुंबियांचा टाहो; सरकारकडे सुटकेची याचना
वसीमला १० वर्षांची शिक्षा झाल्याची बातमी गोपाळगंजमधील त्याच्या घरी पोहोचताच कुटुंबात सन्नाटा पसरला आहे. वसीमच्या वृद्ध आई-वडिलांचे रडून रडून हाल झाला आहे. पीडित कुटुंबाने तातडीने गोपाळगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. आपल्या निष्पाप मुलाला कडक कायद्यांची माहिती नव्हती, त्याला फसवून किंवा जाणूनबुजून असे करायचे नव्हते, त्यामुळे त्याला परत भारतात आणण्यात यावे, अशी आर्त हाक कुटुंबियांनी दिली आहे.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे प्रकरण सुपूर्द
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोपाळगंज जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. जिल्हा प्रशासनाने या घटनेची संपूर्ण माहिती केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला पाठवली आहे. वसीम अकरमच्या मायदेशी वापसीसाठी राजनैतिक पातळीवर आवश्यक पावले उचलण्याची शिफारस प्रशासनाने केंद्र सरकारकडे केली आहे. या घटनेने परदेशात राहणाऱ्या भारतीयांना तिथल्या कडक कायद्यांचे पालन करण्याबाबत पुन्हा एकदा सतर्क केले आहे.