इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:52 IST2026-05-17T12:52:10+5:302026-05-17T12:52:55+5:30
Buldhana Fuel Shortage Clash: सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे पेट्रोल पंपावर तुंबळ हाणामारी. पोलिसांसमोरच व्यक्तीला बदडले. इंधन तुटवड्यामुळे वाढला तणाव.

इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
बुलढाणा: देशात आणि राज्यात सुरू असलेल्या इंधन तुटवड्याचे आता अत्यंत गंभीर आणि हिंसक पडसाद उमटू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार राडा झाला. धक्कादायक बाब म्हणजे, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच २०-२५ जणांच्या टोळीने एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला- जात आहे.
नेमकी घटना काय?
इंधनाचा तुटवडा असल्याने मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन पोलीस कर्मचारी तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या देखरेखीखालीच पेट्रोल-डिझेलची विक्री सुरू होती. मात्र, रांगेत उभे राहण्यावरून किंवा डिझेलच्या प्रमाणावरून काही जणांमध्ये अचानक वाद उफाळून आला. या वादाचे रुपांतर काही वेळातच तुंबळ हाणामारीत झाले.
"२०० लोकांच्या जमावासमोर दोन पोलीस काय करणार?"
पोलिसांच्या उपस्थितीतच एका व्यक्तीला जमिनीवर पाडून बेदम मारहाण होत असताना इतर नागरिक कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्यावर, "२०० लोकांचा आक्रमक जमाव आणि आम्ही केवळ दोन पोलीस, आम्ही तरी काय करणार?" अशी हतबलता संबंधित पोलीस कर्मचारी व्हिडिओमध्ये व्यक्त करताना दिसत आहे. या हतबलतेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही आता बोट ठेवले जात आहे.
हिंसेकडे वळणारे इंधन संकट
मलकापूर पांगरा येथील या मारहाणीची पोलीस दखल घेतील आणि दोषींवर कारवाई करतीलच; पण एकंदरीतच पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचा संयम सुटत चालला असून परिस्थिती हिंसेकडे वळत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
वाशिम-अकोल्यात डिझेलसाठी पेट्रोल पंपावर राडा
वाशिम: मान्सून तोंडावर आला असतानाच राज्यातील ग्रामीण भागात इंधन टंचाईचे अत्यंत गंभीर संकट उभे ठाकले आहे. वाशिम आणि अकोला परिसरातील पेट्रोल पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तासनतास, नव्हे तर कित्येक दिवस ताटकळत उभे राहावे लागत आहे. या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या तणावातून वाशिम येथील एका पेट्रोल पंपावर वाहनधारक आणि शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पंपांवर अनिश्चिततेचे वातावरण
अनेक इंधन केंद्रांवर तेल कंपन्यांकडून पुरवठा कमी होत असल्याचा दावा पंप चालकांनी केला आहे. डिझेलच्या काही मोजक्या उपलब्ध साठ्यासाठी शेकडो लोक रांगेत उभे राहत असल्याने वाद उफाळून येत आहेत. वाशिममधील घटनेतही रांगेत उभे राहण्यावरून वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.