"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:31 IST2026-05-17T12:30:19+5:302026-05-17T12:31:48+5:30
पत्रकार परिषद घेत अभिनेत्याचे पत्नीविरोधात गंभीर आरोप, मुलांनाही भेटता येईना

"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रवि मोहन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने पत्नी आरतीपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. या घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान शनिवारी रवि मोहनने एक खळबळजनक प्रेस कॉन्फरन्स घेतली. यात पत्रकारांशी बोलताना त्याला आपले अश्रू अनावर झाले. "जोपर्यंत घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी अभिनयापासून दूर राहीन," अशी मोठी घोषणा त्याने यावेळी केली, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
या पत्रकार परिषदेत रवि मोहनने त्याची पत्नी आरती आणि तिच्या कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला, "मी गेल्या २३ वर्षांपासून दिवस-रात्र काम करत आहे, माझ्या ९०% फिल्म्स हिट ठरल्या आहेत. मी लहानपणापासून माझ्या कुटुंबासाठी राबलो, पण आज मलाच माझ्या मुलांपासून दूर ठेवले जात आहे. मला माझ्या मुलांना भेटू दिले जात नाहीये, त्यांना शाळेतही माझ्यासोबत पाठवताना सुरक्षारक्षक दिले जातात. मी त्या घुसमटणाऱ्या आयुष्यातून कसातरी पळून आलो आहे."
रवि मोहनने पुढे धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, आरतीने लग्नापूर्वी स्वतःचा हात कापून घेऊन मला लग्नासाठी ब्लॅकमेल केले होते. लग्नानंतर तिच्या कौटुंबिक होम प्रोडक्शनखाली चित्रपट करण्यासाठी माझ्यावर सतत दबाव असायचा. इतकेच नाही तर तिने गायिका केनीशा फ्रान्सिसला सायबर बुलिंगचा शिकार बनवून पळवून लावले."
रविने थेट काळी जादूटोण्याचा आरोप करत म्हटले, "ते माझ्यावर काळी जादू करत आहेत, मला रक्ताच्या उलट्या होत आहेत. माझे कोणतेही वैयक्तिक बँक खाते नाही, सर्व काही आरतीच्या नियंत्रणात असून मला छोट्या रकमांसाठीही जाब विचारायचे. आज ते सुखात राहत आहेत आणि मी भाड्याच्या घरात दिवस काढतोय."
रवि मोहनच्या या खळबळजनक आणि भावनिक पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही तासांतच त्याची पत्नी आरती रवी हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. झोपलेल्या सिंहाला जागं करु नये. ती पिल्लांची आई असेल तर देव तिची मदत करतो. माझं मौन म्हणजे माझा वीकनेस नाही त्याला तुम्ही गृहित धरु शकत नाही. माझ्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि माझ्या स्वाभिमानासाठी मी माझ्या कंफर्ट झोनबाहेर येईन आणि सत्य मांडत जगाचा सामना करेन. कारण सत्य नेहमीच जिंकतं."
रवि मोहनने लावलेल्या गंभीर आरोपांवर ती काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या कौटुंबिक वादामुळे एका चांगल्या अभिनेत्याला चित्रपटांपासून दूर राहावे लागत असल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.