राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 09:57 IST2026-05-17T09:41:25+5:302026-05-17T09:57:12+5:30
Rajdhani Express Fire News: त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (१२४३१) ला रविवारी पहाटे मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील अलोर परिसरात अचानक आग लागली.

राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (१२४३१) ला रविवारी पहाटे मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील अलोर परिसरात अचानक आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दिल्लीकडे जात असलेल्या या ट्रेनला पहाटे ५.३०च्या सुमारास लुणी-रीछा आणि विक्रमगडदरम्यान आग लागली. ही आग एसी कोच बी-१ मध्ये लागली आणि बघता इतर दोन डब्यांमध्येही ही आग पसरली.
#WATCH | Madhya Pradesh | Fire breaks out in B-1 coach (near SLR end) of Train No. 12431 Thiruvananthapuram–Hazrat Nizamuddin Rajdhani Express between Luni Richha (LNR) and Vikramgarh Alot (VMA) stations. All passengers of the affected coach were safely deboarded and no injury or… https://t.co/S0JK2JT9xwpic.twitter.com/6n7gVqAXOj
— ANI (@ANI) May 17, 2026
६८ प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश
आग लागल्यानंतर ट्रेनमधील हूटर वाजू लागताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. मात्र तातडीने बचावर कार्य करून दुर्घटनाग्रस्त डब्यांमधून सर्व ६८ प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली.
त्वरित मदत आणि बचाव कार्याला सुरुवात
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून त्वरित मदत आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. ही दुर्घटना झाली ते ठिकाण राजस्थानमधील कोटा रेल्वे मंडळाच्या अधिकार क्षेत्रात येते. मात्र रतलाम मंडळ मुख्यालय जवळ असल्याने रतलाम रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक अश्विनी कुमार हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आग लागण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.