Fuel Price Hike: आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:28 AM2021-07-27T08:28:07+5:302021-07-27T08:32:50+5:30

Fuel Price Hike: आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने विकली जातील, अशी चर्चा सुरु झाली असून, केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनदरवाढ सुरूच आहे. (Fuel Price Hike)

अर्थव्यवस्था सावरू लागल्याने इंधन मागणी वाढली आहे. तुलनेने पुरवठा मर्यादित असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव 'जैसे थे'च आहे. (petrol diesel prices)

इंधनदर गगनाला भिडले आहेत. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमती GST अंतर्गत आणण्यावरही विचार सुरू असून, आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने विकली जातील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीवर वेगवेगळ्या राज्यात वॅट आणि स्थानिक कर लागतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये तफावत असते.

GST Council ने पेट्रोल व डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश करण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती समान पातळीवर आणण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही, असे हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचा प्रती लीटर दर १०० रुपयांवर गेला आहे. पेट्रोल-डिझेलवर ३२ रुपयांचे केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते.

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

कंपन्यांनी आतापर्यंत ४२ वेळा दरवाढ केली. यात पेट्रोल ११.५२ रुपयांनी वधारले. तर, डिझेल जवळपास १० रुपयांनी महागले. पेट्रोल-डिझेलचा सर्वाधिक दर मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपये, तर डिझेलचा भाव ९८.६७ रुपये आहे.

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!