...अन् मुख्यमंत्र्यांमधील 'फोटोग्राफर' जागा झाला, लोणारचं मोबाईल क्लीक

By महेश गलांडे | Published: February 6, 2021 12:43 PM2021-02-06T12:43:23+5:302021-02-06T13:13:34+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील सरोवराची वनकुटी व्ह्यू पॉईंटवरून पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली. भेटीदरम्यान त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सरोवराचे छायाचित्रही घेतले.

मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्ष मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा ‘कृउबास’ चे सभापती जालींधर बुधवत आदींसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पाहणी करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरित्या करण्यात यावा.

सरोवर परिसरात मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा.

लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी. लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात.

पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत, फोटोग्राफी हा त्यांचा छंद असून यापूर्वीही त्यांनी लोणारचे फोटो हेलिकॉप्टरमधून काढले होते.

लडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार अभयारण्य हे महाराष्टातून घोषित झालेले दुसरे ‘रामसर’ स्थळ आहे.

लोणारला रामसर तिर्थस्थळाचा दर्जा दिल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी हे छायाचित्र ट्विटरवरुन शेअर केले होते, जे स्वत: उद्धव ठाकरेंनी काढले आहे.

लोणार सरोवर परिसराच्या जतन,संवर्धन व विकासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा येथे बैठक. पालकमंत्री @DrShingnespeaks उपस्थित. येथील गावकऱ्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करु आणि या विकासप्रक्रियेत त्यांचा सहभाग घेऊन विकास आराखडा राबवू-मुख्यमंत्री

यंदाच्या भेटीतही लोणारच्या फोटोचा मोह उद्धव ठाकरेंना आवरता आला नाही, ‘लोणार’चा विषय पूर्वीपासूनच मनात. बऱ्याच वर्षांपूर्वी मी काढलेले छायाचित्र प्रदर्शनात लावल्यानंतर प्रदर्शन पाहणारी लोकं या चित्राबद्दल कुतुहलाने विचारत. तेथे पोहोचायचे कसे? याबाबतही विचारत. तेव्हापासूनच या भागाचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने झाला पाहिजे हे मनात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.