Republic Day 2026 Speech: शाळा, कॉलेज, सोसायटीमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला द्यायचंय छोटंसं पण दमदार भाषण? 2 मिनिटांत जिंका साऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:33 IST2026-01-24T12:29:09+5:302026-01-24T12:33:33+5:30

Republic Day 2026 Speech in Marathi: आपल्या समस्त भारतीयांसाठी इतिहासातले २ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे आपण दरवर्षी साजरे करतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त झालो हे खरे आहे, पण २६ जानेवारी १९५० रोजी आपण खऱ्या अर्थाने 'प्रजासत्ताक' झालो. आजच्या दिवशी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान स्वीकारून भारताने लोकशाहीची एक नवी पहाट पाहिली. या दिवशी व्यक्त होण्यासाठी पाहू भाषणांचे काही नमुने.

२६ जानेवारी हा केवळ सुटीचा दिवस नाही, तर आपल्या हक्कांची जाणीव करून देणारा आणि कर्तव्यांची शपथ घेणारा 'राष्ट्रीय सोहळा' आहे. आज लाल किल्ल्यापासून ते गल्लीबोळातील शाळांपर्यंत जेव्हा तिरंगा डौलाने फडकतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. पण अनेकांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. चला तर मग, या ऐतिहासिक दिनानिमित्त जाणून घेऊया संविधानाचे महत्त्व आणि नवीन पिढीला प्रेरणा देणारे काही दमदार भाषणाचे नमुने...

"आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो. आज २६ जानेवारी, आपला प्रजासत्ताक दिन! १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला असला, तरी २६ जानेवारी १९५० पासून खऱ्या अर्थाने आपण आपल्या संविधानानुसार राज्यकारभार सुरू केला. आजच्या दिवशी आपण भारताला एक सार्वभौम, समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले. हे संविधान आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देते. आपण सर्वजण संविधानाचा आदर करूया आणि एक सुजाण नागरिक बनण्याची शपथ घेऊया. भारत माता की जय!"

"उपस्थित सर्व मान्यवर आणि देशप्रेमी नागरिकांना नमस्कार. आजच्या दिवशी आपण त्या महामानवाचे स्मरण केले पाहिजे ज्यांनी आपल्याला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान दिले - ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. लोकशाहीची मूल्ये, समता, बंधुता आणि न्याय ही आपल्या संविधानाचे मुख्य खांब आहेत. संविधानामुळेच आज भारतातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आपण केवळ हक्कांची मागणी न करता, संविधानाने दिलेल्या कर्तव्यांचेही पालन करूया, हाच खरा संविधान गौरव ठरेल."

"आज आपण येथे तिरंग्याला वंदन करण्यासाठी जमलो आहोत, पण हा तिरंगा इतका उंच फडकत आहे कारण यामागे हजारो क्रांतिकारकांचे बलिदान आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारख्या तरुणांनी हसत हसत फाशी स्वीकारली, तर गांधीजी, टिळक आणि सावरकरांनी आयुष्य देशासाठी झिजवले. आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण त्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना स्मरून हे वचन देऊया की, त्यांनी मिळवलेले हे स्वातंत्र्य आपण कधीही धोक्यात येऊ देणार नाही. जय हिंद!"

"आपल्या या परिसरातील सर्व रहिवाशांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. आपण वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक येथे एकत्र राहतो, हीच आपल्या भारताची विविधता आणि एकता आहे. संविधानाने आपल्याला एकजुटीने राहण्याची ताकद दिली आहे. आपल्या परिसराची स्वच्छता राखणे, कायद्याचे पालन करणे आणि एकमेकांना मदत करणे, हीच खरी देशसेवा आहे. चला, आज आपण आपल्या भागाला आणि पर्यायाने देशाला अधिक सुंदर बनवण्याचा निर्धार करूया."

"मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण स्वतःला विचारले पाहिजे की, आपण देशाला काय देऊ शकतो? भ्रष्टाचारमुक्त भारत, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि डिजिटल प्रगती हे आपले ध्येय असले पाहिजे. केवळ झेंडावंदन करणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे, तर आपल्या कामातून राष्ट्राची प्रगती साधणे हे खरे राष्ट्रप्रेम आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर देशाच्या हितासाठी करूया आणि भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवूया."