सदानंद औंधे
मिरज (जि.सांगली) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन बचतीचे आवाहन केले असताना सरकारी तेल कंपन्यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपांवरपेट्रोल-डिझेल टंचाईचे चित्र निर्माण झाले आहे. विशेषतः पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा खप अधिक असला, तरी मागणीच्या तुलनेत डिझेलचा पुरवठा कमी असल्याची तक्रार पेट्रोलपंपचालकांनी केली आहे.
मिरजेतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून उधारीवरील इंधन पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. ‘आधी पैसे, मग इंधन’ हे धोरण लागू करण्यात आले असून, आगाऊ रक्कम भरूनही मर्यादित प्रमाणातच इंधन मिळत असल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे.
पंपचालकांनी अतिरिक्त साठा करू नये, यासाठी कंपन्यांनी पुरवठ्यावर नियंत्रण आणले आहे. पंपावरील इंधन पूर्ण संपल्यानंतरच सहा ते दहा हजार लिटर डिझेल किंवा पेट्रोलचा पुरवठा केला जात असल्याने अनेक पंप दिवसभर कोरडे पडत आहेत. एका पंपावर इंधन नसल्यास वाहनचालकांची गर्दी दुसऱ्या पंपावर होत असून, त्यामुळे रांगा वाढत आहेत.
दररोज ४ लाख लिटर इंधन पुरवठा
मिरजमधील डेपोतून दररोज सुमारे चार लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा चार जिल्ह्यांमध्ये केला जातो. त्यामध्ये डिझेलचा वाटा सर्वाधिक जवळपास दोन तृतीयांश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मालवाहतूक, शेती आणि औद्योगिक वापरामुळे डिझेलची मागणी पेट्रोलपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चार जिल्ह्यांतील दररोजचा अंदाजित इंधन पुरवठा
इंधन प्रकार | दररोज पुरवठा (लिटर) | टक्केवारी |
डिझेल | २.६५ लाख लिटर | ६६ टक्के |
| पेट्रोल | १.३५ लाख लिटर | ३४ टक्के |
| एकूण | ४ लाख लिटर
चार कोटी लिटर साठवण क्षमता
मिरज रेल्वेस्थानकाजवळील इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम डेपो तसेच हजारवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम डेपोतून हा पुरवठा केला जातो. इंडियन ऑइल डेपोतून दररोज सुमारे १२५ टँकर, तर भारत पेट्रोलियम डेपोतून सुमारे १५० टँकरद्वारे इंधन वाहतूक केली जाते. या दोन्ही डेपोंमध्ये मिळून सुमारे चार कोटी लिटर इंधन साठवणुकीची क्षमता आहे.
इंधन संपल्याशिवाय नवी मागणी नाही
मुंबईहून रेल्वे वॅगनद्वारे इंधन पुरवठा नियमित सुरू असला तरी कंपन्यांनी पूर्वीची प्रोत्साहनात्मक विक्री पद्धत बंद करून नियंत्रित वितरण सुरू केल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. स्वयंचलित यंत्रणेमुळे पंपांवरील साठ्याची माहिती थेट डेपोला मिळत असल्याने इंधन संपल्याशिवाय नवीन मागणी नोंदवता येत नसल्याचेही पंपचालकांनी सांगितले.
कशासाठी लागू केले निर्बंध?
युद्धस्थितीत साठेबाजी होऊ नये आणि इंधनसाठ्यावर ताण येऊ नये, यासाठीच हे निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Web Summary : Fuel shortage hits Sangli, Kolhapur, Satara, and Ratnagiri due to supply cuts. Petrol pumps report limited diesel availability despite high demand. Companies restrict supplies, causing pump closures and long queues, with cash-before-fuel policy adding to woes.
Web Summary : सांगली, कोल्हापुर, सतारा, रत्नागिरी में ईंधन की कमी आपूर्ति घटने से हुई। पेट्रोल पंपों ने उच्च मांग के बावजूद डीजल की सीमित उपलब्धता की सूचना दी। कंपनियों ने आपूर्ति पर प्रतिबंध लगाया, जिससे पंप बंद हो गए और लंबी कतारें लगीं, नकद-पहले-ईंधन नीति से परेशानी बढ़ गई।