NEET Exam: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागले आहे. नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य संशयित आणि बी.ए.एम.एस. चा विद्यार्थी शुभम खैरनार याला ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे पेपरफुटीचे नाशिक कनेक्शन समोर आले असून, या रॅकेटने किती हायटेक पद्धतीने हा गुन्हा केला, याचे धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.
देवदर्शनाला निघालेल्या संशयिताला अटक
शुभम खैरनार हा भोपाळमधील सीहोर येथील सत्यसाई युनिव्हर्सिटीत बी.ए.एम.एस. च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अटकेपासून वाचण्यासाठी शुभमने मुंडन केले होते आणि कपडेही बदलले होते. तो देवदर्शनासाठी निघाला असताना नाशिक पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. आता सीबीआयचे विशेष पथक त्याचा ताबा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहे.
आगाऊ 'गेस पेपर' आणि ३० मिनिटांचा तो खेळ
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली डिजिटल कॉपी नाशिकमधील एका गुप्त ठिकाणी तयार करण्यात आली होती. जेव्हा प्रश्नपत्रिकांचे ट्रंक कुरियरने नेले जात होते, तेव्हा एका संशयित कर्मचाऱ्याच्या मदतीने हे ट्रंक केवळ ३० मिनिटांसाठी उघडण्यात आले. याच अर्ध्या तासात हाय-डेफिनिशन पोर्टेबल स्कॅनरचा वापर करून पेपर स्कॅन करण्यात आला. मोबाईल फोटोऐवजी स्कॅनर वापरण्यामागचा उद्देश हा होता की, टेलीग्रामवर पाठवलेला पेपर अगदी स्पष्ट असावा, जेणेकरून तो सोडवणे सोपे जाईल.
टेलिग्रामवरून व्यवहाराचे जाळे
शुभम खैरनारने हा पेपर टेलिग्रामच्या माध्यमातून मिळवला आणि तो पुढे हरियाणातील एका खरेदीदाराला विकल्याचा आरोप आहे. यापूर्वी हा पेपर नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसधून फुटल्याची चर्चा होती, मात्र ताज्या तपासानुसार कुरियर पोहोचवण्यादरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आलं.
एनटीएकडून परीक्षा रद्द; तपास सीबीआयकडे
३ मे २०२६ रोजी झालेली ही परीक्षा राजस्थानमधील गैरप्रकार आणि वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृतपणे रद्द केली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
Web Summary : NEET paper leak: Nashik student arrested for using hi-tech scanner. Paper scanned during transit, sold via Telegram. Exam cancelled, CBI investigates.
Web Summary : नीट पेपर लीक: नासिक का छात्र हाई-टेक स्कैनर के इस्तेमाल के आरोप में गिरफ्तार। ट्रांजिट के दौरान पेपर स्कैन किया, टेलीग्राम के माध्यम से बेचा। परीक्षा रद्द, सीबीआई जांच जारी।