Sunil Tatkare Sharad Pawar Meeting: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सारेकाही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेले एक पत्र व्हायरल झाले असून, या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक झाली असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल, असे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले आहे. अशा सर्व चर्चा रंगल्या असतानाच, आज अचानक सुनील तटकरे शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. या अचानक झालेल्या भेटीबाबत बाहेर आल्यावर सुनील तटकरे यांनी माहिती दिली.
शरद पवार-सुनील तटकरे भेटीमागचे कारण काय?
"शरद पवारांची तब्येत अनेक दिवस ठिक नसल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला मी गेलो होतो. त्यासाठीच मी गेले काही दिवस वेळ मागितला होता. पण त्यावेळी शरद पवार ब्रीचकँडी रूग्णालयात उपचार घेत होते. आज मी गुवाहाटीला एनडीएचे मुख्यमंत्री सरमा यांच्या शपथविधीला गेलो होतो. उद्या नितेश राणेंचा दौरा आहे, परवा माझे काही दौरे आहेत. आज शरद पवारांना वेळ होता त्यामुळे मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. बाकी कुठलाही विषय नव्हता. अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय आणि आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका ही अशीच राहणार आहे. यात कुठलाही वेगळा विचार नाही. आजच्या भेटीत इतर कुठलाही विषय चर्चेत आला नाही," असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
राजकीय वर्तुळात चर्चा काय?
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या नेतृत्वाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. याचदरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही झाले. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाला हल्लीच देण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या यादीचा फोटो समोर आला. या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आले नसल्याचे उघड झाले. तसेच या पत्रातील यादीमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावासमोर सरचिटणीस या पदाचा उल्लेख आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Web Summary : Amidst NCP leadership speculation, Sunil Tatkare met Sharad Pawar, citing health concerns. He denied political motives, affirming allegiance to Ajit Pawar's leadership. Omission of senior leaders' names from a party list sparked further debate.
Web Summary : राकांपा नेतृत्व अटकलों के बीच, सुनील तटकरे शरद पवार से मिले, स्वास्थ्य संबंधी चिंताओं का हवाला दिया। उन्होंने राजनीतिक इरादों से इनकार किया, अजित पवार के नेतृत्व के प्रति निष्ठा की पुष्टि की। पार्टी सूची से वरिष्ठ नेताओं के नामों को हटाने से आगे बहस छिड़ गई।