'मुलगा पोलीस', चांगलं स्थळ येईल; भाजी विक्रेत्याचा 'पोलीस' होण्याचा बनाव; धाडस करून चक्क स्वतःचे फ्लेक्सही लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:34 IST2026-04-21T12:33:12+5:302026-04-21T12:34:20+5:30

जेव्हा पोलिसांनी त्याची कागदपत्रे आणि नियुक्ती पत्राची चौकशी केली, तेव्हा ऋषिकेशची बोबडी वळली. तपासात समोर आलं की, हा सगळा केवळ एक 'दिखावा' होता

'Son of a policeman', a good place will come; Vegetable seller pretends to be a 'policeman'; He dares to put up his own flex | 'मुलगा पोलीस', चांगलं स्थळ येईल; भाजी विक्रेत्याचा 'पोलीस' होण्याचा बनाव; धाडस करून चक्क स्वतःचे फ्लेक्सही लावले

'मुलगा पोलीस', चांगलं स्थळ येईल; भाजी विक्रेत्याचा 'पोलीस' होण्याचा बनाव; धाडस करून चक्क स्वतःचे फ्लेक्सही लावले

कल्याणराव आवताडे 

धायरी : 'सिंघम' किंवा 'सिम्बा' सारख्या चित्रपटांचा प्रभाव म्हणावा की लग्नासाठी मुलीवाल्यांनी घातलेली अट? एका तरुणाने चक्क पोलीस न होताच अख्ख्या परिसरात आपल्या निवडीचे फ्लेक्स लावले, पेढे वाटले आणि चक्क पोलिसांनाच आपल्या दारात ओढून घेतले. पण हा 'आनंदोत्सव' अवघ्या काही तासांतच 'गुन्ह्यात' बदलला आणि तरुणाचा हा खाकीचा बनाव नऱ्हे पोलिसांनी उघड केला.

​सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील तिडके डेअरी भागात राहणारा ऋषिकेश राजू जाधव (२६) हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न होतं, पण निसर्गाने त्याला साथ दिली नाही. उंची कमी पडल्याने पोलीस भरतीचं दार त्याच्यासाठी बंद झालं. दुसरीकडे, घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी तगादा लावला होता. कदाचित 'मुलगा पोलीस आहे' असं सांगितलं तर चांगलं स्थळ येईल, किंवा केवळ आईचा आनंद पाहण्यासाठी ऋषिकेशने एक भयंकर धाडस केलं. त्याने चक्क आपण 'पुणे पोलीस' दलात भरती झाल्याची खोटी बातमी घरी दिली.

ऋषिकेशने केवळ खोटं बोलून थांबवलं नाही, तर त्याने सोसायटीमध्ये आनंदाने पेढे वाटले. चौकात स्वतःच्या फोटोसह 'पुणे पोलीस पदी निवड' झाल्याचे भव्य फ्लेक्स लावले. मोबाईलवर पोलीस वर्दीतील फोटो व्हॉट्सॲप स्टेटस म्हणून ठेवले. आपल्या हद्दीतील एक सामान्य मुलगा पोलीस झाला, हे पाहून नऱ्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी मोठ्या अभिमानाने त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर जेव्हा पोलिसांनी त्याची कागदपत्रे आणि नियुक्ती पत्राची चौकशी केली, तेव्हा ऋषिकेशची बोबडी वळली. तपासात समोर आलं की, हा सगळा केवळ एक 'दिखावा' होता.

अतिउत्साह नडला, गुन्हा दाखल झाला...

​कोणताही अधिकृत अधिकार नसताना पोलीस असल्याचं भासवणं आणि महाराष्ट्र पोलिसांच्या चिन्हाचा गैरवापर करणं ऋषिकेशला अंगलट आलं आहे. तो सार्वजनिक सेवक नसतानाही त्याने तसे भासवून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल त्याच्यावर BNS कलम २०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांची 'हटके' भूमिका...

"पोलीस भरती होणं हे सन्मानाचं काम आहे, पण त्यासाठी कष्ट करावे लागतात. अशा प्रकारे खोट्या प्रसिद्धीच्या जोरावर वर्दीचा अपमान करणं चुकीचं आहे," असं मत नऱ्हे पोलिसांनी व्यक्त केलं आहे.

Web Title : विवाह प्रस्तावों के लिए एक मराठी आदमी ने पुलिस होने का नाटक किया

Web Summary : महाराष्ट्र के एक व्यक्ति ने पुलिस अधिकारी होने का नाटक किया, यहाँ तक कि अपने विवाह की संभावनाओं को बेहतर बनाने की उम्मीद में फ्लेक्स बैनर भी लगाए। नर्हे पुलिस ने धोखाधड़ी का पर्दाफाश किया और प्रतिरूपण और पुलिस प्रतीक के दुरुपयोग के लिए आरोप दायर किए।

Web Title : Marathi Man Fakes Being a Cop to Attract Marriage Proposals

Web Summary : A Maharashtra man pretended to be a police officer, even putting up flex banners, hoping to improve his marriage prospects. Narhe police exposed the fraud and filed charges for impersonation and misuse of the police emblem.