आयटी कंपनीत ड्रायव्हर असतानाही मॅनेजर असल्याचे सांगून केले लग्न; तरुणीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:57 IST2026-04-30T15:57:16+5:302026-04-30T15:57:36+5:30
लग्नाच्या आधीपासूनच एका महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने स्वतः आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचे खोटे सांगून तरुणीशी लग्न केले

आयटी कंपनीत ड्रायव्हर असतानाही मॅनेजर असल्याचे सांगून केले लग्न; तरुणीची फसवणूक
पुणे : आयटी कंपनीत ड्रायव्हर असतानाही स्वतःला मॅनेजर असल्याचे भासवून एका तरुणीची फसवणूक करत लग्न केले आणि नंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपक दौलतराव मुरकुटे (रा. खांदवेनगर, खराडी), रेखा दौलतराव मुरकुटे (रा. देवकर, ता. लातूर), राहुल दौलतराव मुरकुटे (रा. कर्वेनगर), कल्पना पिंटू मुंढे (रा. अरबुजवाडी, परभणी) आणि अमृता आनंद शेटे (रा. संघर्ष चौक, चंदननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हा प्रकार खराडी येथील खांदवेनगर परिसरात २५ मे २०२५ पासून सुरू असून आतापर्यंत चालू असल्याचे समोर आले आहे. याबाबत २६ वर्षीय विवाहित महिलेने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मुरकुटे याचे लग्नाच्या आधीपासूनच एका महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने स्वतः आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचे खोटे सांगून फिर्यादीशी लग्न केले. प्रत्यक्षात तो ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. लग्नानंतर आरोपींनी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करत क्रूर वागणूक दिली. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिला माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून आंबेगाव पोलिसांनी संबंधित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे पुढील तपास करत आहेत.