रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 21:03 IST2026-04-30T21:01:58+5:302026-04-30T21:03:36+5:30

दावडीतील तरुणाची हत्या करून प्रेताची जंगलात लावली होती विल्हेवाट

Reel star Patala's exploits, Crime Branch solves 12-year-old kidnapping-murder case | रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा

रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा

कल्याण : तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासातून उलगडा केला. याप्रकरणामुळे रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) याचा आणखी एक कारनामा पुढे आला असून त्याच्यासह चंद्रकांत बाळाराम गायकर आणि सुरेश गोपाळ देगावत उर्फ छोटू (३२) या तिघांना अटक करण्यात आली आहे. सात एकर जमीन व्यवहारातील पैशांच्या वादातून करण अरविंद बागुल (२३) या तरुणाची हत्या करून त्याचे प्रेताची विल्हेवाट मुरबाड येथील जंगलात केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत दिली.

डोंबिवली पूर्वच्या दावडी येथील २३ वर्षीय तरुणाचे २०१४ मध्ये अपहरण झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून केलेल्या चौकशीत त्याने इतर साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली.

रील स्टार पाटील आणि मयत करण बागुल याच्यासोबत जमीन विकासाच्या आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी त्याचे अपहरण करून त्याला दावडी येथील पाटील याच्या एका कार्यालयात नेण्यात आले. तेथे मुख्य आरोपी पाटील याने लोखंडी रॉडने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने मृतदेह कारमधून मुरबाड येथील बारवी धरण परिसरातील जंगलात नेऊन त्याची विल्हेवाट लावली.

या प्रकरणात मुरबाड पोलिस ठाण्यात त्या काळात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाशी संबंधित नोंदी तपासून तोच मृतदेह असल्याची खात्री करण्यात आली. त्यानुसार मूळ अपहरणाच्या गुन्ह्यात खून व पुरावा नष्ट करण्याची कलमे जोडण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खूनासाठी वापरलेला लोखंडी रॉडही जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहे.
 

Web Title : रील स्टार का कारनामा: 12 साल पुराने अपहरण-हत्या मामले का खुलासा।

Web Summary : कल्याण क्राइम ब्रांच ने 12 साल पुराने अपहरण और हत्या के मामले को सुलझाया, जिसमें रील स्टार पाटिल की भूमिका सामने आई। उन्हें, दो अन्य लोगों के साथ, 2014 में जमीन सौदे के विवाद में करण बागुल की हत्या करने और मुरबाड जंगल में शव ठिकाने लगाने के आरोप में गिरफ्तार किया गया।

Web Title : Reel star's crime: 12-year-old kidnapping-murder case solved.

Web Summary : Kalyan crime branch solved a 12-year-old kidnapping and murder case, revealing reel star Patil's involvement. He, along with two others, were arrested for killing Karan Bagul over a land deal dispute in 2014 and disposing of the body in Murbad forest.