शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:30 IST2026-04-30T22:28:49+5:302026-04-30T22:30:08+5:30
आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ व गोकूळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यास मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले.

शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर : भाजपचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या जीवनातील जास्तीत-जास्त दिवस कुठे खर्ची घातलेत, याची सविस्तर माहिती आम्हाला आहे, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी लगावला.
आमदार पाटील यांनी मंत्री मुश्रीफ व गोकूळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यावर टीका केली. त्यास मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंदगडचे जे आमदार आहेत त्यांचे शिक्षण किती, त्यांचे पूर्वायुष्य काय याबद्दल सगळी माहिती मला आहे. त्यांनी आपल्या जीवनातील जास्तीत-जास्त दिवस कुठे खर्ची घातलेत, याचीही सविस्तर माहिती आम्हाला आहे. खरेतर मी त्याबद्दल फारसे काही बोलणारच नव्हतो. परंतु; ते नाहकरित्या सातत्याने माझ्यासह नविदबद्दल बदनामीकारक बोलत आहेत. एकदाचा त्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच त्यांना हे शेवटचे उत्तर देत आहे. त्यानंतर त्यावर बोलणार नाही. त्यांनी हे जर थांबवलं नाही तर आम्ही आणि शिंदेसेनेच्या ज्यांच्यावर त्यांनी टीका केली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या मंगळवारी, बुधवारी भेटून थेट विचारणार आहोत.
आमचे लोक त्यांना मते देणार नाहीत.. -
ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात घेतलेल्या एका सभेमुळे त्यांच्या आठ जागा पडल्या हे त्यांचे दुःखही समजू शकतो. परंतु; ते ज्या पद्धतीने आमची नाहक बदनामी करत आहेत. त्यामुळे आमचे लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. त्यांनी गोकूळच्या निवडणूकीत उभा केलेल्या उमेदवारांना आमचे लोक मते देतील, याची खात्री देऊ शकत नाही. ही गोष्टही आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत.