IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:09 IST2026-05-11T15:45:45+5:302026-05-11T16:09:08+5:30
IPS TanuShree : तनुश्री यांनी २०१४ मध्ये सीआरपीएफमध्ये 'असिस्टंट कमांडंट' म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि नंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

देशात असे अनेक आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारी आहेत, जे आधीपासूनच कोणत्या ना कोणत्या सरकारी नोकरीत होते आणि ती सोडून त्यांनी नागरी सेवांमध्ये प्रवेश केला. बिहारच्या मोतिहारीमध्ये जन्मलेल्या तनुश्री यांपैकीच एक आहेत

तनुश्री यांनी २०१४ मध्ये सीआरपीएफ (CRPF) मध्ये 'असिस्टंट कमांडंट' म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि नंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

सामान्यतः असं दिसून येतं की, अनेक महिला लग्नानंतर कुटुंबाच्या जबाबदारीसाठी आपली नोकरी आणि स्वप्नं सोडून देतात, परंतु तनुश्री यांनी तसं केलं नाही. त्यांनी लग्नानंतर घर सांभाळत यूपीएससीमध्ये यश मिळवलं.

आयपीएस तनुश्री यांचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी झाला. त्यांनी दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण बिहारमध्येच पूर्ण केलं आणि त्यानंतर बोकारो येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केली.

पुढील उच्च शिक्षण आणि नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी त्या दिल्लीला गेल्या, जिथे त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या 'मिरांडा हाऊस'मधून इतिहास (ऑनर्स) पदवी मिळवली. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारीही सुरू ठेवली होती.

२०१५ मध्ये तनुश्री यांचं लग्न झालं. अशा परिस्थितीत अभ्यासासोबतच घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणं हे त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या जिद्दीने आणि वेळेच्या उत्तम नियोजनामुळे त्यांना आपलं ध्येय गाठण्यास मदत झाली.

२०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि २०१७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांची 'AGMUT' कॅडर अंतर्गत आयपीएस म्हणून निवड झाली. सध्या त्यांची नियुक्ती जम्मू-काश्मीरमध्ये आहे.

काश्मीरमधील राज्य तपास यंत्रणेत (SIA) पोलीस अधीक्षक (SP) म्हणूनही काम केलं आहे, जिथे त्यांनी दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणं हाताळली आहेत.

तनुश्री आपल्या यशाचं श्रेय आपल्या कुटुंबाला देतात. त्यांचे वडील निवृत्त डीआयजी आहेत आणि त्यांची बहीणही सीआरपीएफमध्ये कमांडंट पदावर कार्यरत राहिली आहे. त्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनामुळेच तनुश्री यशस्वी झाल्या.

तनुश्री यांची गोष्ट अनेकांसाठी, विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महिलांसाठी एक खरी प्रेरणा आहे. समर्पण आणि पाठबळ असेल तर माणूस नक्कीच यशस्वी होतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

















