"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:30 IST2026-05-11T16:28:08+5:302026-05-11T16:30:50+5:30
'राजा शिवाजी'च्या सेटवरचा किस्सा सांगताना दिशा परदेशी म्हणाली...

"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा ओलांडून मोठी मजल मारली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी सध्या चर्चेत आली आहे. नुकताच दिशाने सिनेमातील तिच्या पाण्यातील सीनचा अनुभव सांगितला. तर आता तिने संजय दत्तसोबत काम करण्याच्या आठवणींना उजाळा दिला.
'झूम'ला दिलेल्या एका मुलाखतीत दिशा म्हणाली, "संजय सर सेटवर अतिशय शांत असतात. ते येऊन आपले काम करतात आणि शॉट झाल्यावर एका कोपऱ्यात जाऊन बसतात. अभिनयामध्ये काही सुधारणा हवी असल्यास ते अत्यंत प्रेमाने 'बेटा, हे असं नाही असं कर' म्हणून समजावून सांगायचे. विशेष म्हणजे, जेव्हा मी त्यांना 'अफजल खान'च्या रूपात पाहिले, तेव्हा मी खरोखरच घाबरले होते. त्यांचा तो लूक आणि जरब इतकी जबरदस्त होती की त्यांच्या समोर राहायलाही धडकी भरत होती."
चित्रपटातील एका थरारक प्रसंगाबद्दल बोलताना दिशा म्हणाली, "एका सीनमध्ये अफजल खान माझ्या गालाला स्पर्श करतो आणि नंतर गळा दाबतो. शूटिंगच्या वेळी संजय सरांनी खरोखरच माझा गळा दाबला होता जेणेकरून तो सीन वास्तववादी वाटेल. पण शॉट संपताच त्यांनी लगेचच माझी माफी मागितली. ते एक अतिशय नम्र आणि जंटलमन कलाकार आहेत." संजय दत्त यांच्यासारख्या मोठ्या स्टारसोबत काम करणे हे शिकण्यासारखे आहे असंही ती म्हणाली.
मुलाखतीदरम्यान दिशाने आपल्या मृत्यूच्या दृश्याबद्दलही भाष्य केले. ती म्हणाली, "जेव्हा तुमचा दिग्दर्शक हुशार आणि मदतीला तत्पर असतो, तेव्हा कठीण सीन करणे सोपे जाते. रितेश देशमुख यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच माझा आत्मविश्वास वाढला. या सीनसाठी आम्ही कोणत्याही डुप्लिकेट, VFX किंवा AI तंत्रज्ञानाचा वापर न करता तो अतिशय नैसर्गिक पद्धतीने चित्रित केला."
दिशाने सिनेमात अफजल खानच्या बेगमची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे . राजा शिवाजी'मध्ये कलाकारांची मोठी फौज आहे. रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलीया राणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. संजय दत्त अफजलखान, विद्या बालन बडी बेगम, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजी भोसले यांच्या भूमिकेत आहेत. तर बोमन इराणी, अमोल गुप्ते, फरदीन खान, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.