काय सांगता, रेल्वेच्या डब्यांनाही असते एक्सपायरी डेट? रिटायर झालेल्या डब्यांचं पाहा पुढे नेमकं काय होतं..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 17:41 IST2026-05-11T17:28:42+5:302026-05-11T17:41:36+5:30
Retired train coaches converted into restaurants: Uses of old railway coaches after retirement: रिटायर झाल्यानंतर रेल्वेचे इंजिन आणि डब्यांचे काय होते पाहूया.

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे. रोज लाखो प्रवासी यातून प्रवास करतात. पण ही रेल्वे नेमकी किती वर्ष काम करते आणि तिचे आयुष्य संपल्यावर काय होते, याबद्दल आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असते. ज्याप्रमाणे माणसांच्या निवृत्तीचे वय असते, तसेच रेल्वेच्या डब्यांचे आणि इंजिनचेही ठराविक आयुष्य असते.(Retired train coaches converted into restaurants)

रेल्वेचे डबे किंवा इंजिन हे लोखंडी असले तरी त्यांची झीज होत असते आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठराविक काळानंतर त्यांना सेवेतून बाद करणं गरजेचं असतं. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार एका रेल्वे कोचचे सरासरी वय हे साधारणपणे २५ ते ३० वर्षे असते. तर रेल्वे इंजिनचे आयुष्य ३० ते ३५ वर्षांपर्यंत असू शकते. मग रिटायर झाल्यानंतर रेल्वेचे इंजिन आणि डब्यांचे काय होते पाहूया. (Uses of old railway coaches after retirement)

सध्या नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. जुने झालेले डबे स्टेशनच्या बाहेर किंवा मोकळ्या जागेत उभे केले जातात. त्यात सजावट करुन आलिशान कोच रेस्टॉरंट सुरु केले जाते. यामुळे पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात बसून जेवणाचा अनुभव मिळतो तर रेल्वेला उत्पन्न.

काही रेल्वेच्या डब्यांचा वापर लाईफलाईन एक्सप्रेस सारख्या फिरत्या दवाखान्यांसाठी केला जातो. ज्या ठिकाणी पक्के बांधकाम नाही, तिथे या डब्यांचे रुपांतर शाळा किंवा ऑफिससाठी केले जाते.

मुख्य लाईनवर रिटायर झालेले डबे अनेकदा रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा तांत्रिक कामांसाठी वापरले जातात. रेल्वेच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या अवजड गोष्टींसाठी किंवा ट्रॅकच्या देखभालीसाठी कॅम्प कोच म्हणून वापर केला जातो.

रेल्वेचे काही डबे किंवा इंजिन ऐतिहासिक असते त्यांना म्युझियममध्ये जतन करुन ठेवले जाते. दिल्ली किंवा पुण्यासारख्या शहरात ऐतिहासिक इंजिनचा वारसा पाहायला मिळतो.

ज्या डब्यांची अवस्था अतिशय खराब असते आणि ते वापरण्यायोग्य नसतात. त्यांची भंगारात विक्री केली जाते. अशा डब्यांचे लोखंड वितळवून पुन्हा नवीन वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते.

















