“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 18:20 IST2026-05-11T18:18:39+5:302026-05-11T18:20:21+5:30
Sunil Tatkare News: एक दिवसही दादांची आठवण आल्याशिवाय जात नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
Sunil Tatkare News: दादांचा विश्वासाचा हात आमच्यावर होता. दादांना एक विकासपुरुष म्हणून राज्याने अनुभवले आहे. आता दुसरे दादा होणे नाही पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार आहोत. एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात आनंद आहे कारण वहिनी या दादांची विकासाची दृष्टी घेऊन काम करत आहात, त्याबद्दल सुनील तटकरे यांनी पक्षाच्यावतीने सुनेत्रा अजित पवार यांचे विशेष आभार मानले.
रायगड जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. दादांचे विशेष प्रेम कोकणावर म्हणजे रायगड जिल्ह्यावर राहिले आहे. निसर्ग वादळाने जेव्हा कोकण खचला होता, त्यावेळी कोकणासाठी दादा धावून आले आणि विशेष पॅकेज दिले होते. कोरोना काळात कोण फिरत नव्हते. त्यावेळी मास्क लावून लोकांच्या मदतीला दादा धावून जात होते हेही आवर्जून सुनील तटकरे यांनी सांगितले.
एक दिवसही दादांची आठवण आल्याशिवाय जात नाही
दादांच्या हस्ते अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला होता. आज तुमच्या हस्ते भूमिपूजन होत असून या वर्षांच्या अखेरीला उद्घाटन करायला तुम्हाला यावे लागणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. माझे वय ७१ आहे पण एक दिवसही दादांची आठवण आल्याशिवाय जात नाही. या देशातील पहिले रोल मॉडेल कुठले असेल तर ते म्हणजे बारामती याचा उल्लेख देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी केला होता, याची आठवण सुनील तटकरे यांनी यावेळी केली. बारामतीच्या प्रत्येक झाडात... फुलात... पानात दादांचा श्वास पाहायला मिळतो आहे. विकासाची दृष्टी ठेवून दादा काम करत आले. तसाच रोह्याच्या नगरीत दादांचा श्वास इथेही पहायला मिळत आहे. दादांचे ऋण आमच्या अंत:करणात आहे अशी कृतज्ञता सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मायावतींना 'बहन' , ममतांना 'दीदी' , जयललितांना 'अम्मा' अशी त्यांची ओळख आहे तशी ओळख देशातील पहिल्या 'वहिनी' म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची असेल, असेही सुनील तटकरे यावेळी म्हणाले.